संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असतानाच आता थेट चोरट्यांनी पोलिस चौकीपासून अवघ्या पन्नास फुटावरील तब्बल ९ दुकाने एकाच रात्रीत फोडली आहेत. यामधील ८ दुकानातून चोरट्यांनी रोकड आणि इतर साहित्य असा ४ लाख १ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे फुरसूंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
विशाल सिताराम यादव (वय ३३, रा.मळाईपार्क फुरसूंगी) यांनी चोरी झाल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यादव यांचे भेकराईनगर चौकात शिव मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. रविवारी (दि ३) पहाटे चोरट्यांनी दुकानावरील पत्रा उचटून, त्याखालील पीओपी फोडून दुकानात प्रवेश केला. नंतर दुकानातील २ लाख ७४ हजार रुपये चोरी केले. त्याबरोबर त्यांच्या मोबाईल शॉपीला लागून असलेली इतरही काही दुकाने चोरट्यांनी फोडून रोकड व ऐवज चोरी केला आहे.
तर दुसरे तक्रारदार सोहनलाल फुआराम चौधरी (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी पुरबजी ट्रेडींग व इतरांच्या दुकानाच्या छताला लावलेले व्हेटीलेशनचे फॅन काढून आत प्रवेश केला आणि दुकानातील १ लाख २७ हजार रुपये चोरी केल्याचे म्हटले आहे. चोरट्यांनी मोबाईल शॉपी, चहाचे दुकान, मिठाईचे दुकान अशी विविध ९ दुकाने फोडली आहेत. दुकानात चोरीचा प्रयत्न झाला असून, त्यातून काही ऐवज चोरीला गेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे शहरभर प्रमाण वाढले
पुणे शहरात घरफोडीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी बंद फ्लॅट चोरट्यांकडून टार्गेट केले जात आहेत. अशात चोरट्यांनी दुकांने फोडून चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. तसेच दारु विक्रीची दुकाने फोडून चोरट्यांनी रोकड आणि मद्याच्या बाटल्या चोरी केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. तर चोरट्यांनी पोलिस चौकीपासून जवळ असलेली दुकाने फोडल्याने, चोरट्यांना पोलिसांचा तरी धाक आहे की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सहा महिन्यात पुण्यातून 989 वाहने गेली चोरीला
दुचाकींच्या शहरातील भयावह चित्र दिवसेंदिवस आणखीनच गडद होत चालले असून, पुणेकर आता पोलिसांना आता तरी वाहन चोरांना “आवरा” अशी आर्त हाक मारू लागले आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असताना त्या उघड करण्यातही पोलिसांना म्हणावे, तसे यश येत नसल्याचे वास्तव आहे. गेल्या सहा महिन्यात तब्बल ९८९ वाहने चोरीस गेली आहेत. त्यातील केवळ २४२ वाहने शोधण्यात यश आले आहे.