संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पती व सासूच्या वादातून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोर्णिमा गणेश धोत्रे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे व नणंद सोनाली लखन यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या पोर्णिमा धोत्रे हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता, विवाहानंतर पोर्णिमाचा पती गणेश, सासू मंगल तसेच नणंद सोनाली हे पोर्णिमाला किरकोळ कारणातून शिवीगाळ, दमदाटी करत तू केलेले जेवण जास्त बनवते ते वाया जाते, तुझ्यामुळे आमची बरबादी झाली, तू आमच्या घरातून निघून जा असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने तसेच होणाऱ्या त्रासाला कंटाळून ३० मार्च रोजी पोर्णिमाने घराला बाहेरुन कडी लावून इमारतीच्या छतावर जाऊन चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. दरम्यान पोर्णिमा गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पोर्णिमाचा मृत्यू झाला.
याबाबत विवाहितेचे वडील रामदास गेनबा जाधव (वय ५० वर्षे) डोंगरगाववाडी लोणावळा (ता. मावळ जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विवाहितेचा पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे दोघे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे), नणंद सोनाली लखन ननवरे (रा. खर्डा ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत गणेश तानाजी धोत्रे व मंगल तानाजी धोत्रे या दोघांना अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करत आहेत.