संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून तब्बल १५ लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे. नांदेडिसीट, कोंढवा व बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. शहरात सोनसाखळी, लुटमार, प्रवाशांचे दागिने चोरी तसेच घरफोड्या या स्ट्रीट क्राईममध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, पोलिसांना यातील चोरटे पकडण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे.
पहिल्या घटनेत नांदेडसिटी पोलीस ठाण्यात नंदकुमार गारूळे (वय २३, रा. नर्हे) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नंदकुमार हे नऱ्हे येथील एशियन कॉलेजजवळील एका इमारतीत राहतात. नंदकुमार हे २७ मे ते ३ जून या कालावधीत घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाटातून सोन्याचे व चांदिचे असे ४ लाख ९७ हजार रुपयांचे ऐवज चोरून पोबारा केला आहे.
दुसरी घटना कोंढवा भागात घडली असून, सुखसागरनगर येथील कमल रेसीडेन्सी या इमारतीत घडली आहे. चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून पावणे आकरा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ५९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. मंगळवारी दुपारी तक्रारदार या अत्यंतविधीसाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातून दागिने व रोकड असा १० लाख ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यासोबतच सोसायटीच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी काढून नेला आहे.
तिसरी घटना बिबवेवाडीत घडली असून, बंद फ्लॅट फोडून २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.