सोलापूरच्या कुर्डुवाडीत मोठी घरफोडी; राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरला (संग्रहित फोटो)
पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छांद घातला असून, तीन घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल २७ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसत आहे.
पहिली घटना पुण्याचा मध्यभाग असलेल्या रविवार पेठेत घडली आहे. चोरट्यांनी ‘रामलिला ज्वेलर्स’ हे सोन्याचे दुकान फोडून १४ लाख ९५ हजार रुपयांचे हिऱ्याचे दागिने व रोकड तसेच चांदी व सोने असा ऐवज चोरून नेला आहे. गुरूवारी (दि. १२) रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात राजीव खताळ (३५, रा. कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली. यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार दुकानाचे मालक असून, नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले असता हा प्रकार घडला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हाळे करत आहेत.
दुसरी घटना धानोरी रोडवरील साठे वस्तीत घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत कांता चौधरी (वय ६२, रा. शिवकृपा निवास, लेन नं. ३, साठे वस्ती, लोहगाव, धानोरी रोड) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार येथील शिवकृपा निवास येथे राहतात. दरम्यान, ११ ते १३ जून या कालावधीत घराला कुलूप लावून गेल्या होत्या. तेव्हा अज्ञाताने घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले लक्ष्मी मुर्ती, सोन्याचे दागिने, लेडीज घड्याळ व रोख रक्कम असा ४३ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार आदलिंग करत आहेत.
तिसऱ्या घटनेत चंदननगरमधील एका तरुणाचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी ११ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी तुषार गुप्ता (३१, रा. तत्त्व सोसायटी, चंदननगर) यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री एक ते पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. तक्रारदार एक दिवसांसाठी घर बंद करून गेले होते. तेव्हा त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने, मुर्ती व रोख रक्कम असा ११ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करत आहेत.