संग्रहित फोटो
पुणे : हडपसर परिसरातील रामटेकडी, मांजरी बुद्रुक आणि फुरसुंगी येथील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोलापूर रोड भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांच्या किमती मुद्देमालाची चोरी केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मात्र, चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. सोलापूर रस्ता परिसरात सतत या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामटेकडी येथील प्रथमा बिल्डिंगमध्ये २९ मेच्या मध्यरात्री सव्वाबारा ते अडीचच्या सुमारास घरफोडी झाली. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन अनोळखी व्यक्तींनी तक्रारदार आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. तसेच, ५४ हजार रुपयांचे रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरून नेले.
हडपसरमध्ये घावटे वस्ती येथील कमल कॉलनी फेज एकमध्ये २९ मे रोजी दुपारी पावणेदोन ते साडेतीन या वेळेत चोरीची घटना घडली आहे. याबाबत हडपसर पोलिसांत ३५ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. चोरट्याने त्यांच्या घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकर उचकटून ७६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
तसेच तिसरी घटना फुरसुंगी येथील मातृछाया बिल्डिंगमधील सदनिकेत २८ मे रोजी सकाळी १२ ते रात्री साडेदहा या वेळेत घडली. या प्रकरणी ३४ वर्षीय तरुणाने फुरसूंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार फ्लॅटला कुलूप लावून गेल्यानंतर चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट उघडून त्यातील १ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
झेरॉक्स दुकानातून सहा लाखांचे प्रिंटींग हेड चोरीला
जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीशेजारी गॅलक्सी झेरॉक्सच्या दुकानात २८ मे रोजी पहाटे साडेतीन ते सव्वाचार या वेळेत चोरी झाली. याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एक अनोळखी व्यक्ती रिक्षामधून तक्रारदाराच्या दुकानाजवळ आली. त्यानंतर त्या व्यक्तीने शटरला लावलेली कुलुपे तोडली आणि दुकानातून चार महागडे प्रिंटींग हेड्स चोरून नेले.