सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता चोरट्यांनी दुचाकीवर निघालेल्या महिलेला चालत्या गाडीवर धक्का देऊन त्यांच्याकडील चार लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. आळंदी रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार महिला विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. महिलेच्या नात्यातील एकाचा विवाह समारंभ दिघी येथे होता. सोमवारी (१६ डिसेंबर) विवाह समारंभावरुन महिला आणि पती दुचाकीवरुन घरी निघाले होते. दरम्यान, विवाह समारंभात दागिने घालण्यासाठी त्यांनी चार लाखांचे दागिने नेले होते. विवाहात दागिने घातलेही होते.
विवाह समारंभातून त्या पतीसोबत दुचाकीवर पुन्हा परत निघालेल्या होत्या. तेव्हा आळंदी रस्त्यावर बोपखेल फाट्याजवळ रात्री पावणेदहाच्या सुमारास पाठिमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तक्रारदार महिलेकडील दागिने असलेली पिशवी चोरून नेली. चोरट्यांनी धक्का दिल्याने दुचाकी घसरली आणि दाम्पत्य खाली पडले. सुदैवाने या घटनेत महिला आणि तिच्या पतीला गंभीर दुखापत झाली नाही. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा चोरी; दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज चोरला
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.