संग्रहित फोटो
जत : राज्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, जत तालुक्यातून चोरीची एक मोठी बातमी समोर आली आहे. यावरुन चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे दिसून येत आहे. उटगी (ता. जत) येथे एका घरात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात दाेन जण गंभीर जखमी झाले आहेत. चाकूचा धाक दाखवून १ लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने, रोख रक्कम ६० हजार व इतर १५ हजार असा पावणेदोन लाख किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे.
चोरट्याने साहेबलाल बाबासो मुल्ला (वय २७) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे, तर चांद बाबासो मुल्ला गंभीर जखमी झाले आहेत. यातील साहेबलाल जत येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. चाेरट्यांनी लाकडी दांडके, व गज या साहित्याचा वापर केला आहे. घरमालकाने सुमारे आठ चोरटे असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. रात्री उशिरा उमदी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. उटगीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जाडरबोबलाद व उटगी रस्त्याला तेली वस्ती नजीक साहेबलाल मुल्ला व त्यांचे कुटुंबीय राहत आहेत.
लोखंडी रॉड व गजाने मारहाण
रविवारी रात्री मुल्ला कुटुंबीय जेवण करून झोपी गेले होते. मध्यरात्री ८ जणांच्या चोरट्याच्या टोळक्याने मुल्ला यांच्या घरात प्रवेश केला. सुरुवातीला साहेबलाल मुल्ला यांच्या पायावर लोखंडी रॉड व गजाने मारहाण करून जखमी केले. घरातील लहान मुले व महिला यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे व चांदीचे दागिने, ६० हजार रुपयाची रोकड ताब्यात घेतली. भयभीत झालेले मुल्ला कुटुंबीय कोणताही प्रतिकार करू शकले नाही. अर्ध्या तासात चोरटे सर्व मुद्देमाल लंपास करून फरार झाले. चोरट्यांनी मुल्ला कुटुंबीयांच्या घरातील सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले होते. त्यामुळे ते कोणासही संपर्क साधू शकले नव्हते.
हे सुद्धा वाचा : पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण; भरधाव कारने माय-लेकाला उडवले
तपासासाठी दोन पथके रवाना
सोमवारी सायंकाळी तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण व उमदी पोलीस अशी दोन पथके रवाना करण्यात आली. घटनेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या शक्यता तपासल्या जात आहेत. सोमवारी दुपारी वैज्ञानिक प्रयोग, ठसे तज्ज्ञ, श्वान पथक पाचारण करण्यात आले होते.
हे सुद्धा वाचा : खड्डे चुकवण्याच्या नादात भीषण अपघात; कार दुचाकीला धडकली अन्…