सौजन्य - नवराष्ट्र टीम
जेजुरी : आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गावरील जेजुरी सासवड रस्त्यावरील बेलसर फाटा जवळ एसटी बस व दुचाकीचा जोरदार अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले. रमेश किसन मेमाणे (वय ६०), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय ४०) आणि पांडुरंग दामोदर मेमाणे (वय ६५), (सर्व रा. बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे, ता. पुरंदर) अशी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
सासवड- जेजुरी रस्त्यावर बेलसर फाटा दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू असून, गुरुवारी दुनीमक १६ जानेवारी रोजी साडेतीन वाजताच्या दरम्यान दुचाकीवरुन बसून तिघे जण रस्ता क्रॉस करून सासवडकडे जात होते. त्याचवेळी समोरून जोरदार वेगाने येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसली. बसचा वेग प्रचंड असल्याने बसने चालकाने बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरीही दुचाकी १५० फुट फरफटत एका शेतात नेली. यामध्ये दुचाकीवरील सर्वाना जोरदार मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने जेजुरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
एकाच अपघातात मृत्यू पावलेले तिघेही एकाच गावातील आणि एकाच वस्तीवरील असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकाच वेळी तिघांच्या मृत्यूची बातमी पसरली आहे. जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे याबाबत पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी घटनास्थळी भेट देवून अपघाताची माहिती घेतली. तसेच अपघातास जबाबदार असलेले एसटीचे चालक तसेच रस्ते बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; स्वारगेट परिसरात बांगलादेशी घुसखोराला पकडले
महिला पोलिसाला कारने उडवले
राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.