यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी घडलेल्या दोन हत्येच्या घटनांनी संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. शहरातील गजबजलेल्या भागात भरदिवसा 30 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, संतापाच्या भरात तिला तलवारीने ठार मारले. या दोन्ही घटनांमुळे यवतमाळकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
दारू पिण्यावरून बाप-लेकात जोरदार वाद; झोपेत असताना बापानेच केली मुलाची हत्या
पहिली घटना चांदणी चौकात घडली आहे. मनीष शेंद्रे (वय 30, रा. पाटीपुरा) या युवकावर भरदिवसा चाकूने वार करण्यात आले. हल्लेखोराने मनीषच्या पोटावर आणि मानेवर गंभीर वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.सुरुवातीच्या तपासानुसार, काही महिन्यांपूर्वी कळंब चौक परिसरात झालेल्या वादामध्ये मनीष शेंद्रे याचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्या प्रकरणात एक युवकाचा बंदुकीने गोळी झाडून खून करण्यात आला होता. त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन विशेष पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली आहेत. पोलिस निरीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
दुसरी धक्कादायक घटना वडगाव जंगल पोलीस ठाणे हद्दीतील यावली (कारेगाव) येथे घडली. येथे दलुराम गुलाब राठोड (वय 59) या इसमाने पत्नी बेबीबाई दलुराम राठोड (वय 56) हिचा चारित्र्यावर संशय घेत तलवारीने निर्घृण खून केला.
दलुराम हा अत्यंत संशयी स्वभावाचा असून, सतत पत्नीवर संशय घेत असे. शनिवारी सकाळच्या सुमारास घरगुती वाद विकोपाला गेला आणि दलुरामने घरातील तलवार उचलून बेबीबाईवर वार केले. या घटनेदरम्यान त्यांचा मुलगा संदीप दलुराम राठोड आईचा आवाज ऐकून धावत आला. त्याने वडिलांचा प्रतिकार करत आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान दलुराम खाटेवर पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस पुढील तपास करत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News: रांजणगावातून विक्रेत्याचे अपहरण करून मारहाण करत हिंजवडीत…; 5 जणांवर गुन्हा दाखल