संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात सातत्याने जड वाहनांचे अपघात होत असून, पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वारासह दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी सिमेंट मिक्सरच्या चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फुरसूंगीतील मंतरवाडी चौकातील शेल पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे.
संतोष प्रल्हाद कांबळे (वय ३९, रा. कवडगाव, अहिल्यानगर) आणि सुदर्शन गोरख पुलावळे (वय ३८, रा. उरूळी देवाची) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. सिमेंट मिक्सर चालक नागेश नाना कोरके (वय ३०, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्यापैकी एक जण हा चालक असून दुसरा हा विटभट्टीवर कामगार आहे. सोमवारी (दि.1) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास संतोष व सुदर्शन त्यांच्या पल्सर दुचाकीवरून आपल्या कामासाठी निघालेले होते. हांडेवाडी चौकाकडून ते मंतरवाडी (सासवड रोड) दिशेने जात होते. हा रस्ता निसरडा झाला आहे. पावसाने चिखल आहे. त्यामुळे वाहने स्लीप होतात. दरम्यान, वळणावर अचानक भरधाव दुचाकी सिमेंट मिक्सरच्या खाली आली. त्यात दुचाकीवरील दोघेही चाकाखाली आल्याने चिरडले. काही कळण्याच्या आतच दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोघांना पुढील कार्यवाहीसाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, सिमेंट मिक्सरवरील चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, असे फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले. अपघातातील सिमेंट मिक्सरमधून सिमेंट वाहुन नेले जात होते. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. दुचाकी स्लीप होऊन सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आली की, धक्का बसून हा अपघात झाला हे, तपासानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.