संग्रहित फोटो
पुणे : मोबाईल पाहत बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तसेच तीक्ष्ण शस्त्राने मारून गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने पळविण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसरमधील मांजरी बुद्रूक येथील तुकाराम तुपे नगर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रादार मांजरी येथील तुकाराम तुपेनगर येथे राहण्यास आहेत. रात्री ते मोबाईल पाहत घरी बसलेले होते. घरात दुसरे कोणी नव्हते. आठच्या सुमारास अचानक एकजण घरात शिरला. त्याने तक्रारदारांच्या गुडघ्यावर कशाने तरी मारून त्यांना जखमी केले. त्यांच्या गळ्यातील तब्बल ९० हजार रुपायंची सोन्याची साखळी चोरून पोबारा केला. चोरटा घरातून पळून गेल्यानंतर तक्रारदारांनी आरडाओरडा केला. नंतर शेजारी व इतर घटनास्थळी आले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच येथे धाव घेऊन पाहणी केली. पोलीस अधिक तपास करत आहेत. थेट घरात शिरून तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून ज्येष्ठाला लुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच या घटना रोखण्यात पोलिसांना दिवसेंदिवस अपयशी होत आहेत. पोलीस या चोरट्यांचा युद्धपातळीवर शोध घेत असले तरी त्यांना थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराडी रोडवर एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांकडे ५६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.