सौजन्य - नवराष्ट्र टीम
छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना रोडवर मध्यरात्री दोन तरुणींनी दारूच्या नशेत राडा घालून मोठा गोंधळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणींनी भररस्त्यात शिवीगाळ करत एकमेकींना मारहाण केली त्याचबरोबर हॉटेलची तोडफोडही केली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दारू प्यायल्यानंतर नशा चढते आणि या नशेत कोण कधी काय करेल याचा नेम नाही. अशाच दोन तरुणींनी नशेत धक्कादायक प्रकार केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास जालना रोडवरील मोंढा नाका येथे घडला आहे. जिन्सी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरती प्रकाश कांबळे (वय 30, रा. उस्मानपुरा, पीर बाजार) आणि प्रतीक्षा बाळासाहेब भादवे (वय 25, रा. उस्मानपुरा, पीर बाजार) अशी अटक केलेल्या तरुणींची नावे आहेत. दोन्ही तरुणी नशेत आल्यावर रस्त्यावरच एकमेकींना शिवीगाळ करू लागल्या. त्यानंतर जवळच असलेल्या डॉमिनोज पिझ्झाजवळ जाऊन त्यांनी तोडफोड केली. दुकानातील काच फोडल्या. त्यानंतर त्या मुख्य रस्त्यावर आल्या आणि पुन्हा एकमेकींना शिवीगाळ व मारहाण सुरू केली. जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणींना ताब्यात घेतले. घटनेचा व्हिडिओ नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दोन मटण दुकान मालकांत हाणामारी
पुलाची शिरोलीतून एक मोठी घटना समोर आली आहे. ग्राहक बोलविण्यावरुन दोन मटण दुकान मालकांत हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गावाच्या मध्यभागी मटण मार्केट आहे. या मटण मार्केटमध्ये एखादे ग्राहक आले की आपल्याच दुकानात मटण खरेदी करावे, यासाठी ग्राहकाला बोलवले जाते. यातून मोठी स्पर्धा मटण विक्री करणारे दुकान मालकांत नेहमी सुरू असते. याच कारणावरून रविवारी ग्राहकाला बोलविण्यावरून मुनाफ चिकन सेंटर व विजय मटण शॉप यांच्यात तुफान हाणामारी झाली. या मारामारीत मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे जखमी झाले. याबाबत मुनाफ कवठेकर व विजय घोटणे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.