सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यभरात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत असून, तिने आत्महत्या केल्याच्या दिवशीही सासरच्यांकडून तिचा अनन्वित छळ झाल्याचे समोर आले असून, तिला त्यादिवशी अमानुष मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. अहवालानुसार वैष्णवीच्या अंगावर एकून २९ जखमा आढळल्या आहेत. यातील १५ जखमा या मृत्यूच्या २४ तासाच्या आतील आहेत, अशी माहिती पोलीसांनी न्यायालयात दिली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत २८ मे पर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी दिला.
वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी बावधन पोलीसांनी पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१) यांना १७ मे रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तर, सासरे राजेंद्र हगवणे (वय ६३), दिर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांना २३ मे रोजी अटक करण्यात आली असून, त्यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे.
वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; अंगावर मारहाणीचे तब्बल 29 व्रण, 5-6 जखमा तर…
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शशांक, लता आणि करीश्मा यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. वैष्णवी हिला ज्या पाईपने मारहाण केली, तो पाईप जप्त केला आहे. तसेच, एक दुचाकी, हुंड्यात मिळालेली फॉरच्युनर, चांदीची भांडी, २ पिस्तुल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर, पाचही जणांची बँक खाती गोठवली आहेत, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते यांनी न्यायालयात दिली. दरम्यान, हुंड्यामध्ये मिळालेले ५१ तोळे सोने आरोपींना एका बँकेत तारण ठेवले आहे. ते कोणत्या कारणासाठी तारण ठेवले आहे?, आणखी काही सोन्या, चांदीची भांडी जप्त करायची आहेत, यासह गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, असा युक्तीवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिला.
वैष्णवीच्या अंगावर २९ जखमा
शवविच्छेदनाच्या अहवालात वैष्णवीच्या अंगावर एकून ३० जखमा आढळल्या. त्यातील २९ जखमा शवविच्छेदनापुर्वीच्या आहेत. त्यातील १५ जखमा या मृत्युच्या चोवीस तासाच्या आतील आहेत. तर, एक जखम ही मृत्युच्या चार ते सहा दिवस आधीची आहे. ११ जखमा या मृत्युपुर्वी ५ ते ६ दिवसांपुर्वीच्या आहेत. तर, दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपुर्वीच्या आहेत, अशी माहिती पोलीसांनी न्यायालयात दिली. त्यावरून वैष्णीला आत्महत्येपूर्वी देखील मारहाण झाल्याचे दिसत असल्याचे मत पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत.