शिरोलीत व्यावसायिकाची फसवणूक (फोटो- istockphoto)
शिरोली: प्रेमाच्या जाळ्यात ओढून जवळीकता साधल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालत महिलेसह नऊ जणांनी व्यावसायिकास ५८ लाख ५४ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २०१८ ते मे २०२५ दरम्यान घडला आहे. येळापुरे यांनी दोन महिन्यापूर्वी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात यासंदर्भात लेखी तक्रार दिली होती. मात्र अर्जाची शहानिशा करत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास दीड महिन्याचा कालावधी घालवला.
शिरोली एमआयडीसी पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याने याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे दाद मागणार असल्याचे संबंधित व्यावसायिकाने शिरोली पोलिसांना सांगितले. याबाबत व्यावसायिक फारुक महम्मद येळापुरे ( वय ३३, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेसह नऊजणांवर गुन्हा दाखल केला आहे. रोजिना अल्लाबक्ष मुल्लाणी, अल्लाबक्ष कासीम मुल्लाणी ( दोघे रा. शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर ), मुस्ताक अजीज मुल्ला ( रा. पापाची तिकटी, कोल्हापूर ), दस्तगीर इस्माईल मुजावर, जमीर दस्तगीर मुजावर ( दोघे रा. विशाळगड, ता. शाहूवाडी ), जमाल मौलासाहेब येळापुरे ( रा. शिरोली एमआयडीसी ) यांच्यासह एका स्वयंसेवी संस्थेचा पदाधिकारी भरतकुमार ढंग, एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी अनिल माळवी आणि निवृत्त पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब कोकितकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्याद देऊन दोन महिने झाले. मात्र अद्याप संबंधितांवर समाधानकारक कारवाई झाली नसल्याने येळापुरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दाद मागितल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुलाची शिरोलीतील माळवाडी भागातील फारुक येळापुरे त्यांच्याकडे कामाला असलेला अल्लाबक्ष मुल्लाणी याच्या पत्नीने येळापुरे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मोबाइलमध्ये दोघांचे फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो नातेवाइकांना दाखवून बदनामी करू अशी भीती घालत रोख रक्कम उकळण्यास सुरुवात केली.
हा प्रकार तिचा पती, वडील आणि इतर नातेवाइकांना समजला. त्यांनीही पोलिसांत तक्रार देण्याची भीती घालून पैसे उकळले. सात वर्षांत तब्बल ५८ लाख ५४ हजार रुपये घेऊन ही त्यांची पैशाची मागणी संपली नव्हती. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने येळापुरे यांनी अखेर पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले होते. यापैकी तिघांची जामीनावर सुटका झाली आहे.