पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस दलात भरती होण्यासाठी तळजाई टेकडीवर नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांना अपमानास्पद शब्दांत हिणवण्यात देखील आलं आहे. या विद्यार्थ्यांमध्ये मुली देखील होत्या. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
दररोज अनेक तरुण- तरुणी पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेला शारीरिक सराव करतात. सोमवारी देखील तळजाई टेकडी परिसरात शारीरिक सराव करत होते. सोमवार सकाळीही नेहमीप्रमाणे काही विध्यार्थी सराव करत होते. त्याचवेळी अचानक दहा ते बारा जणांची एक टोळी तिथे आली आणि त्यांनी सर्व करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अडवत मारहाण केली. विशेष म्हणजे यामध्ये मुलींचाही समावेश होता. “तुमची लायकी नाही पोलीस होण्याची” अशा अपमानास्पद शब्दांत त्यांना हिणवण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या घाटंनंतर संबंधित विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक थेट सहकारनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली असून, संबंधित गुंडांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून परिसरातील सीसीटीव्ही दुतेज तपासले जात आहे. मात्र भावी पोलिसांवरच गावगुंडांनी मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोर गावगुंड कोण होते, त्यांचा उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पुण्यातून एक हत्येची धक्कादायक घटना समोर येत आहे. सख्ख्या मोठ्या भावाने आपल्याच लहान भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरात घडली असून हत्या झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (24) असे आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव अनिकेत दत्तात्रय नवले (26 ) असे आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
प्रवीण आणि अनिकेत हे दोघे बिबवेवाडी भागात राहतात. प्रवीण कामधंदा करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूसाठी पैसे मागून तो कुटुंबियांना त्रास द्यायचा. सोमवारी (14जुलै) सकाळी अनिकेत प्रवीणला समजावून सांगण्यासाठी गेला होता. दारू पियुन आम्हाला त्रास देऊ नको. असे त्याने प्रवीणला सांगितले. त्यावर प्रवीणने अनिकेट्सही वाद घातला. वादातून अनिकेतने प्रवीणवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रहिवाशांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान प्रवीणचा मृत्यू झाला आहे. आरोपी अनिकेतला पोलिसांनी अटक केली असून पुढील करावी करण्यात येत आहे.
दारू पिऊन त्रास दिल्याचा राग अनावर; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून