अरविंद केजरीवालांनी रणशिंग फुंकले! हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना देणार दरमहा १८ हजार रुपये (फोटो सौजन्य-X)
Delhi Assembly Elections 2025 News In Marathi: 2013 पासून दिल्लीत सत्तेत असलेल्या ‘आप’साठी ही 2025 ची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेस पुनरागमनाच्या शोधात आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. याचपार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत आम आदमी पार्टीने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. 2013 पासून दिल्लीत सत्तेत असलेल्या ‘आप’साठी ही निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. याचदरम्यान महिलांसाठी दरमहा २१०० रुपये, संजीवनी योजनेंतर्गत ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी मोफत उपचार, वृद्धांसाठी पेन्शन योजना, दिल्लीकरांसाठी २४ तास शुद्ध पाणी आणि पुजारी आणि पुरोहितांना वेतन यांचा समावेश आहे.
केजरीवाल यांच्यासह पक्षाचे अनेक नेते ‘आप’च्या या आश्वासनांना मास्टरस्ट्रोक म्हणत असताना, भाजप या मुद्द्यावरून हल्लाबोल करत आहे. भाजप या आश्वासनांना केजरीवाल यांची निराशा आणि दिल्लीतील जनतेचा विश्वासघात म्हणत आहे. ते म्हणतात की केजरीवाल जनतेला फक्त खोटी आश्वासने देत आहेत, तर सत्य हे आहे की त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे.
केजरीवाल यांच्या प्रत्येक घोषणेवर भाजप हल्ला करत आहे. ‘आप’ने महिला सन्मान आणि संजीवनी योजना जाहीर केल्यावर भाजपने ही मोठी फसवणूक असल्याचे म्हटले आणि ‘आप’ गेली 10 वर्षे सत्तेत आहे, पण त्यांनी एकाही महिलेला 10 रुपयांची मदत दिली नाही. त्यांनी ही योजना यापूर्वीच राबवायला हवी होती. पण आता निवडणुकीपूर्वी ते वृद्ध आणि महिलांना खोटी आश्वासने देत आहेत, जेव्हा ‘आप’ने दिल्लीतील जनतेला स्वच्छ पाण्याचे आश्वासन दिले होते, तेव्हा भाजपने त्याचाही प्रतिवाद केला.
भारतीय जनता पक्षाने केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाविरुद्ध चाळीस पानी आरोपपत्र जारी केले होते. यामध्ये गंभीर आरोप करण्यात आले. चार्जशीटच्या कव्हर पेजवर ‘दिल्ली सरकार दिवाळखोर, आपचे आमदार श्रीमंत आणि केजरीवाल शीशमहलमध्ये’ असे लिहिले होते. या आरोपपत्रात भाजपने अनेक आरोप केले होते आणि ‘आप’चे प्रत्येक आश्वासन खोटे असल्याचे म्हटले होते.
त्याचवेळी आम आदमी पक्षाने सोमवारी पुजारी आणि पुरोहितांसाठी घोषणा केल्यावर भाजप नेते परवेश वर्मा यांनी केजरीवालांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘मंदिराच्या पुजाऱ्यांना आणि सर्व गुरुद्वारांच्या पुजाऱ्यांनाही वेतन दिले जावे, असे मी वर्षानुवर्षे सांगत आलो आहे, पण केजरीवाल गेल्या 10 वर्षांपासून सर्व मशिदींच्या मौलवींना आणि त्यांच्या साथीदारांना पगार देत आहेत. आता निवडणुका आल्या की त्यांना पुजारी-ग्रंथी आठवतात.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही जाहीरनामा जारी करण्यात आलेला नाही. तसेच कोणतेही मोठे आश्वासन जाहीर केलेले नाही. मात्र भाजप महिला, वृद्ध आणि तरुणांसाठी काही मोठ्या घोषणाही करू शकते, असे मानले जात आहे. नुकतेच भाजपचे खासदार मनोज तिवारी म्हणाले होते की, ते दिल्लीतील जनतेला ‘आप’च्या आश्वासनापेक्षा 5 पट अधिक देण्यास तयार आहेत.