File Photo : Manish Sisodia
नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे आणि माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही पुन्हा सुनावणी सुरू होईल.
गेल्या काही महिन्यांपासून सिसोदिया हे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळावा यासाठी त्यांनी यापूर्वी अनेकदा अर्ज केला होता. मात्र, त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. असे असताना गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांना सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यास सांगितले होते.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 16 जुलै रोजी सांगितले होते की या नोटीसला 29 जुलैपर्यंत उत्तर द्या. त्यानुसार, आज सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सिसोदिया 16 महिन्यांपासून तुरुंगात
सिसोदिया हे 16 महिन्यांपासून तुरुंगात आहेत आणि खटला पुढे जात नाही. ऑक्टोबर 2023 पासून तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निकालात सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता.