सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी शोभा बनशेट्टी यांचा अपक्ष अर्ज दाखल (फोटो - टीम नवराष्ट्र)
सोलापूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे जोरदार राजकारण रंगले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही युती पहिल्यांदाच तीन पक्ष एकत्रित करुन निवडणुका लढत आहेत. यामुळे जागावाटपामध्ये अनेक इच्छुकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये बंडखोरी वाढली आहे. हीच बंडखोरी आता सोलापूर भाजपमध्ये देखील झालेली दिसून आली आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून आले आहे.
महायुतीचे उमेदवार असलेले आणि भाजपचे सध्याचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे. मात्र त्यामुळे सोलापूर शहर मतदारसंघामध्ये बंडखोरी करत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे ‘शहर उत्तर’ मध्ये भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. माजी महापौर बनशेट्टी यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज त्या मागे घेणार की बंडखोरी करणार? यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हे देखील वाचा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?
गुरुवारी (दि. 24) त्यांनी ‘आजोबा गणपती’ चे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, अर्ज सादर करताना काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, ‘बीआरएस’चे नागेश वल्याळ यांची उपस्थिती लक्षवेधी होती. याप्रसंगी ॲड.मिलिंद थोबडे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, अमर बिराजदार, चिदानंद वनारोटे, अशोक कटके, श्रीशैल बनशेट्टी, सुनील शरणार्थी आदी उपस्थित होते.
शोभा बनशेट्टी यांनी उमेदवारीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती .
मात्र भाजपने विद्यमान आमदार देशमुख यांना सोलापूर शहर उत्तरमधून पाचव्यांदा उमेदवारी दिली. त्यामुळे शोभा बनशेट्टी यांनी शहर उत्तरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हे देखील वाचा : पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर तपासादरम्यान कारमध्ये आढळली लाखाेंची रोकड!
“आता कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेतली जाणार नाही. जो विकास व्हायला पाहिजे तो विजयकुमार देशमुख यांना वीस वर्षात करता आला नाही. याउलट आपण महापौर म्हणून केवळ अडीच वर्षाच्या कालावधीत करून दाखविला. देशमुख यांच्या वीस वर्षातील आणि आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीतील कामाची तुलना जनता योग्यवेळी करणार असल्याचा विश्वासही” शोभा बनशेट्टी यांनी व्यक्त केला.
सोलापूरमध्ये तिरंगी लढत
सोलापूरमध्ये भाजप पक्षातील अंर्तगत वाद मिटविण्यास तुर्त तरी पक्षाला अपयश आले आहे. विजयकुमार देशमूख, शोभा बनशेट्टी यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा असताना माजी महापौर महेश कोठेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातून उमेदवारी जाहीर झाल्याने शहरउत्तर तिरंगी लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वंचीत व एमआयएम उमेदवार तयारीत
वंचीत आणि एमआयएम यांच्यासह मनसेचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. लढत तिरंगी होत जरी असली तरी वंचीत एमआयएम आणि मनसेला पडणारे मतदान हे निर्णायक असणार आहे .