Actress Eva Grover (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
इवाचा विवाह हैदर अली खान याच्यासोबत झाला. हैदर हा अभिनेता आमिर खानचा सावत्र भाऊ आहे. लग्नानंतरचे आयुष्य अपेक्षेप्रमाणे सुखाचे नव्हते, असे सांगताना इवा भावूक झाली. तिने सांगितले की, संसार टिकवण्यासाठी तिने अनेक तडजोडी केल्या, पण परिस्थिती दिवसेंदिवस अधिक कठीण होत गेली.
मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, करिअरच्या बदल्यात काही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला गेला होता का? यावर उत्तर देताना इवाने सांगितले की, तिच्या एक्स पतीने तिला काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी जवळीक वाढवण्याचा सल्ला दिला होता. हा विषय तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचे तिने स्पष्ट केले.
इवाच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडे कामाची कमतरता नव्हती. अनेक मालिकांमध्ये आणि प्रोजेक्टमध्ये ती सातत्याने काम करत होती. मात्र एका टप्प्यावर तिने कुटुंबासाठी स्वतःच्या बचतीचा वापर केला. एफडी, प्रॉपर्टी अशी मालमत्ता विकली. घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले.
याच काळात तिला असे काही प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला देण्यात आला, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली. घरातील वाढते खर्च, लाईटबील, मुलाच्या वाढता खर्च अनेक गोष्टीचे प्रेशर तिच्यावर आले. त्या क्षणी तिला स्वतःचा सन्मान आणि स्वाभिमान अधिक महत्त्वाचा वाटला. त्यामुळे तिने तो संबंध कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला.
इवाने आणखी एक महत्त्वाचा खुलासा करत सांगितले की, लग्नाच्या वेळी तिला तिच्या पतीच्या मानसिक आजाराबद्दल फारशी माहिती नव्हती. कालांतराने त्याच्या वागण्यात मोठे बदल दिसू लागले. त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला आणि घरातील वातावरणही बिघडत गेले.
तिने सांगितले की, अनेकदा परिस्थिती इतकी गंभीर व्हायची की, तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहून कुटुंबीय चिंतेत पडायचे. सतत भीतीच्या वातावरणात राहणे तिच्यासाठी अशक्य झाले होते. अखेर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तिने वेगळा मार्ग स्वीकारला.
विशेष म्हणजे, इतके सर्व घडूनही इवाच्या मनात एक्स पतीबद्दल द्वेष नाही. आज त्याची अवस्था चांगली नसल्याचे सांगताना तिने खंत व्यक्त केली. त्याच्याकडे स्थिर राहण्याची जागा नाही, आर्थिक अडचणी आहेत आणि त्याची योग्य काळजी घेणारेही फारसे कोणी नसल्याचे तिने सांगितले.
इवा म्हणाली की, भूतकाळ विसरणे सोपे नसते. काही जखमा आयुष्यभर मनात राहतात. तरीही एक माणूस म्हणून दुसऱ्याबद्दल वाईट वाटणे स्वाभाविक आहे. एकेकाळी आम्ही एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहिली होती, त्यामुळे त्याची आजची परिस्थिती पाहून मनाला वेदना होतात, असेही तिने नमूद केले. इवाच्या या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी अशा गंभीर विषयांवर अधिक संवेदनशीलतेने चर्चा होण्याची गरज व्यक्त केली. अनेक चाहत्यांनी तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या असून, कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी तिने दाखवलेल्या धैर्याचेही कौतुक केले आहे.






