सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : पुरंदर तालुक्यातील भिवरी गावच्या शेतकऱ्याच्या गोठ्यातून तब्बल ९ गाई आणि ९ म्हशींची चोरी झाल्याची घटना घडली होती. यामध्ये शेतकऱ्याचे १७ लाखांचे नुकसान झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र गुन्हा दाखल होताच सासवड पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत केवळ २४ तासांच्या आतमध्ये आरोपीला चोरीस गेलेल्या गाई म्हशी आणि टेम्पोसह ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.
भिवरी येथील शेतकरी संतोष बापूसाहेब कटके यांचा गराडेच्या ढोणेवस्ती येथील गोठ्यात १२० गाई म्हशी आहेत. १३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी सर्व कामे उरकल्यावर संतोष कटके त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर कटके यांच्यासह वीर येथे म्हस्कोबा देवदर्शनासाठी गेले असता ज्ञानेश्वर कटके यांना गोठ्यात गाई म्हशी कमी असल्याची फोनवरून माहिती मिळाली. दरम्यान त्यांनी येवून पाहणी केली मात्र कुठेच दिसून न आल्याने पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली
फिर्यादी संतोष कटके यांनी १४ जुलैला दुपारी गाई म्हशींच्या चोरीची फिर्यादी पोलिसांत दिली. त्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुरंदरमध्ये असल्याने संपूर्ण यंत्रणा पालखी बंदोबस्तात व्यस्त होती. मात्र पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी त्याही परिस्थितीत घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे, पोलीस हवालदार विशाल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण शेंडे, तुषार लोंढे, आणि सचिन किवळे यांचे पथक तयार करून तपास करण्याबाबत आदेश दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोने दिली तपासाला दिशा
पोलीस पथकाने घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर आरोपीने दोन आयशर टॅम्पोमध्ये जनावरे भरून घेऊन जाताना दिसले. त्यातील एका टेम्पोच्या पुढील काचेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा रेडीयममध्ये बनवलेला फोटो चिकटवला होता. आणि तिथेच तपासाला दिशा मिळाली. त्याच फोटोच्या आधारे तपास करून गोपणीय माहितीद्वारे टेम्पो चालक व मालक यांची माहिती घेतली. तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रींक माहितीच्या आधारे सदर आरोपी हा खेड तालुक्यातील मौजे गडद येथील डोंगराच्या पायथ्याला असलेल्या गोठयात असल्याची माहीती मिळाली.
कामगारानेच केली सहकाऱ्यांच्या मदतीने चोरी
चोरीची घटना घडल्यानंतर गोठ्यात काम करणारा महादेव जेवर यादव (मुळ रा. खजुरवारा, जहांगीर टोला, ता.कमजोल, जि. दरभंगा, बिहार) हा फरार होता. पोलीस पथकाने त्या ठिकाणी पाहणी केली असता तिथे आठ म्हशीसह कामगार दिसून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून सासवड न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. कोठडी दरम्यान त्याने इतर गाई व म्हशी (फडतरवाडी, ता, खटाव, जि. सातारा) येथील एका गोठ्यात लपवुन ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित फडतरवाडी येथे जाऊन उर्वरित गाई म्हशी ताब्यात घेतल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करीत आहेत.






