(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मध्ये लवकरच प्रेक्षकांना एक अद्भुत आणि भक्तिमय क्षण अनुभवायला मिळणार आहे. मालिकेत शिव–शक्तीचे भव्यदिव्य अर्धनारीश्वर रूप भूलोकावर अवतरणार असून, अधर्माचा अंत करून धर्माचे उज्ज्वल स्वरूप प्रकट होणार आहे.आई तुळजाभवानी मध्ये रविवार, १ फेब्रुवारी रोजी एक भव्यदिव्य महाएपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कालचक्राची निर्मिती’ या संकल्पनेवर आधारित हा विशेष भाग म्हणजे अधर्मावर धर्माच्या विजयाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
मालिकेच्या कथानकात आता संपूर्ण भूलोक अधर्माच्या प्रभावाखाली अडकलेला असून, सृष्टीवर संकटाचे ढग गडद झाले आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी आता शिवशक्तीचा दिव्य हस्तक्षेप अपरिहार्य ठरतो. त्यासाठीच शिव शक्तीचे भव्यदिव्य अर्धनारीश्वर रूप प्रकट होणार आहे.
या महाएपिसोडमध्ये युद्धभूमीवरील भयावह परिस्थिती उलगडताना दिसते. सूर्यग्रहण, उल्कांचा पाऊस, रक्तासारखे लाल झालेले समुद्र, पेटलेली गावं आणि आक्रोश करणारी सर्वसामान्य जंनता हे सगळं अधर्माच्या विध्वंसाचे चित्र मांडतं. या सर्व विनाशाच्या पार्श्वभूमीवर युद्धभूमीच्या मधोमध महिषासुर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला दिसतो. आदिशक्तीच्या निवेदनातून उलघडत जाते की महिषासुराने कपटाने ग्रहांची स्थिती बदलून विजय जवळजवळ निश्चित केला आहे. या अधर्मावर विजय मिळवण्यासाठी आता एकच मार्ग शिल्लक राहतो शिव आणि शक्तीचा संयोग. हा संयोग कसा घडतो आणि त्यातून कालचक्राची निर्मिती कशी आकार घेते, याची अत्यंत रंजक कथा या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.
हा कालचक्र निर्मितीचा क्षण शिवशक्तीच्या अलौकिक महिम्याची साक्ष देणारा आहे. आई तुळजाभवानी मधील हा महाएपिसोड प्रेक्षकांसाठी श्रद्धा, शक्ती आणि धर्माच्या विजयाचं अविस्मरणीय पर्व ठरणार आहे.
“तुझी अवस्था बाबा सिद्दिकींपेक्षाही वाईट करू…”, बिश्नोई गँगची रोहित शेट्टीला धमकी, 5 आरोपींना अटक
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी ही मालिका देवी तुळजाभवानीच्या पराक्रम, करुणा आणि न्यायाच्या प्रवासावर आधारित आहे. अधर्म, अन्याय आणि अहंकाराविरुद्ध उभी राहणारी देवी शक्ती या मालिकेचा केंद्रबिंदू आहे. समाजात वाढणाऱ्या अधर्माला रोखण्यासाठी आई तुळजाभवानी विविध रूपांत प्रकट होताना दाखवली जाते.
शिव–शक्तीच्या अर्धनारीश्वर रूपाचे महत्त्व
आगामी भागांमध्ये मालिकेला एक आध्यात्मिक उंची देणारा टप्पा दाखवला जाणार आहे. शिव आणि शक्तीच्या एकरूपतेचे प्रतीक असलेले अर्धनारीश्वर रूप प्रेक्षकांना दर्शन देणार आहे. हे रूप स्त्री-पुरुष समानता, सृष्टीचा समतोल आणि सर्जन–संहार यांचा अर्थ उलगडून दाखवते. या अवतारातून अधर्माचा संपूर्ण नाश आणि धर्माचे उज्ज्वल स्वरूप प्रकट होणार आहे.






