( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा मराठी चित्रपट सरकारकडून मिळालेल्या अपुऱ्या नुकसानभरपाईविरोधात एका सामान्य महिलेने उभारलेल्या लढ्याची कथा मांडतो. व्यवस्थेतील अडथळे, न्यायासाठी होणारी धडपड, शेतकरी आणि वंचित घटकांच्या समस्या यांना चित्रपटाने पडद्यावर वास्तववादी पद्धतीने साकारलं आहे.शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी सामान्य माणसाला करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे, शेतकरी आणि उपेक्षित समाजाच्या समस्या यांचं वास्तवदर्शी दर्शन या चित्रपटातून घडतं.
हा चित्रपट २०१३ मधील धर्मा पाटील यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे. समाजातील अनेक न ऐकल्या गेलेल्या आवाजांना आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या सामान्य माणसांच्या भावना या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका व्यक्तीची कथा न राहता, संपूर्ण समाजाच्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करणारा ठरत आहे.
चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा जनाबाई राठोड (उषा नाडकर्णी) या बंजारा समाजातील अशिक्षित महिलेभोवती फिरते. सरकारी प्रकल्पासाठी तिची जमीन ताब्यात घेतली जाते. मात्र, त्याबदल्यात मिळालेली नुकसानभरपाई अत्यंत कमी असल्याने ती सरकारविरोधात न्यायासाठी संघर्ष सुरू करते. तिच्या या लढ्यात रणवीर देशमुख (मंगेश देसाई) आणि नयना पाटील (वीणा जामकर) तिची साथ देतात.
चित्रपटाची कथा आणि पटकथा संजीवकुमार राठोड यांनी लिहिली असून ती प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे. सामान्य माणूस व्यवस्थेविरोधात उभा ठाकण्याची संकल्पना प्रभावी असली तरी त्यात फारसे नावीन्य जाणवत नाही. अशा प्रकारचे अनेक सामाजिक वास्तव दाखवणारे चित्रपट या आधीही आले आहेत. या चित्रपटातील काही प्रसंग मनाला भिडणारे आहेत. मात्र काही ठिकाणी चित्रपट रटाळ वाटायला लागतो. तरीही सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा चित्रपटाचा प्रयत्न लक्षवेधी ठरतो.
एकंदरीत, ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा अन्यायाविरोधातील संघर्ष, शेतकरी आणि वंचित घटकांच्या समस्यांवर भाष्य करणारा सामाजिक आशयाचा चित्रपट असून तो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.
दोन दिवसांत 10 कोटींचा टप्पा पार
12 जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. सामाजिक, दमदार अभिनय आणि वास्तवाला भिडणारी मांडणी यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला
चित्रपटात कलाकरांची फौज
या चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे सनी लिओनी, सपना चौधरी आणि गौतमी पाटील यांनी सादर केलेली गाणी आणि नृत्यप्रसंग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.






