देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात 10,112 रुग्ण आढळले आहेत. तर, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या 67,806 वर गेली आहे तर, भारतातील कोरोना एकूण रुग्णांची संख्या 4.48 कोटी (4,48,91,989) आहे.
आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार, देशात काल 42 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू केरळ मध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये कोरोनामुळे 10 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, दैनिक सकारात्मकता दर 7.03 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 5.43 टक्के नोंदवला गेला. आतापर्यंत एकूण संसर्गांपैकी ०.१५ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. राष्ट्रीय कोविड -19 पुनर्प्राप्ती दर 98.66 टक्के नोंदवला गेला. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,42,92,854 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, XBB.1.16 हे देशातील कोविड प्रकरणांमध्ये सध्याच्या वाढीसाठी जबाबदार कोविड-19 प्रकार आहे. मात्र, भारतातील लोकांमध्ये संकरित प्रतिकारशक्ती (लसीकरण आणि नैसर्गिक संसर्गामुळे) विकसित झाली असल्याचही शास्त्रज्ञ सांगतात.
तज्ञांच्या मते, प्रत्येक विषाणू सतत उत्परिवर्तन करत असतो. उत्परिवर्तनामुळे त्याची नवीन रूपे समोर येतात. Omicron चे sub-variant XBB.1.16 हे भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. XBB.1.16.1 उप-प्रकार XBB.1.16 ची उत्परिवर्तित आवृत्ती आहे.