मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका; चंबळच्या खोऱ्यात 228 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी मध्य प्रदेशमध्ये चंबलच्या खोऱ्यात पुन्हा एकदा काँग्रेसला जोरका झटका दिला आहे. काँग्रेसच्या छोट्या-मोठ्या अशा 228 नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देत पक्षही संपविण्यास सुरुवात केली आहे.

    भोपाळ : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी मध्य प्रदेशमध्ये चंबलच्या खोऱ्यात पुन्हा एकदा काँग्रेसला जोरका झटका दिला आहे. काँग्रेसच्या छोट्या-मोठ्या अशा 228 नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देत पक्ष संपवण्याचे काम सुरु केल्याचे दिसत आहे.

    काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी काँग्रेसचे माजी आमदार राकेश मावई यांना भाजपात आणले होते. आता त्यांच्या नेतृत्वातील नेत्यांना आणले आहे. मुरैना विधानसभेचे काँग्रेसचे आमदार राहिलेले राकेश मवई पक्षात नाराज होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले होते. यामुळे त्यांनी निवडणुका झाल्यानंतर भाजपात प्रवेश केला आहे. शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गेले आणि भाजपात प्रवेश केला होता.

    यानंतर मुरैनामध्ये येत शिंदे यांनी मुरैनातील 228 पदाधिकाऱ्यांना भाजपची वाट धरायला लावली. भाजपमध्ये दाखल झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुरैना महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजू शर्मा, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष हसनैन खान, बनमोर ब्लॉकचे सर्व मंडल अध्यक्ष, मुरैना दक्षिण आणि 15 सेक्टर आणि मुरैना उत्तर आणि जिल्ह्यातील 7 विभागांचे सेक्टर अध्यक्ष आहेत.