महिलांसह ज्येष्ठांना रेल्वेकडून मोठी भेट; तिकीट बुकिंग करताच आपोआपच मिळणार 'लोअर बर्थ'(Photo Credit - X)
नवी दिल्ली : स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून भारतीय रेल्वेला प्राधान्य दिलं जातं. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेकडूनही अनेक महत्त्वाची पावलं उचलेली जात आहेत. त्यातच आता रेल्वेने ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना एक भेट दिली आहे. यापुढे रेल्वे प्रवास करणारे ज्येष्ठ आणि 45 वर्षांवरील महिलांना आता आपोआप लोअर बर्थ (खालचे बाकडे) देण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी केली जात आहे. त्यातच आता राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. रेल्वेने वेगवेगळ्या वर्गामध्ये खालच्या बर्थसाठी विशिष्ट कोटा स्थापित केला आहे. स्लीपर क्लासमध्ये ६-७ लोअर बर्थ, ३ एसीमध्ये ४-५ लोअर बर्थ आणि २ एसीमध्ये ३-४ लोअर बर्थ असणार आहे. हे बर्थ केवळ ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आणि गर्भवती महिलांसाठी राखीव असतील, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Railway Special Trains: विमानप्रवासाच्या संकटात रेल्वेची साथ! मेगा प्लॅन, पुढील 3 दिवस धावणार 89 स्पेशल ट्रेन्स
रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, नवीन आणि अपग्रेड केलेल्या कोचमध्ये रुंद दरवाजे, रुंद बर्थ आणि मोठे डबे, व्हीलचेअरसाठी जागा, रुंद दरवाजे असलेली शौचालये आणि शौचालयात आधार देण्यासाठी अतिरिक्त ग्रॅब रेल अशा विशेष सुविधांसह सुसज्ज केले जात आहेत. अमृत भारत आणि वंदे भारत गाड्यांमध्ये देखील विशेष तरतूदी केल्या जातील.
अपंगांचाही केला जाणार विचार
अपंगांच्या गरजा लक्षात घेऊन या गाड्या डिझाईन केल्या आहेत. ‘वंदे भारत’चे पहिले आणि शेवटचे कोच व्हीलचेअर प्रवेश, रुंद शौचालये आणि सहज हालचाल करण्यास सक्षम आहेत. मेल/एक्सप्रेस, राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये अपंग प्रवाशांसाठी आणि त्यांच्या सोबत्यांसाठी विशेष आरक्षणे आहेत. नियमांनुसार, चार बर्थ (दोन खालच्या आणि दोन मधल्या) स्लीपर आणि ३एसी/३ई वर्गासाठी राखीव आहेत आणि चार बर्थ २एस/सीसी साठी राखीव आहेत.






