मेट्रोमध्ये ‘कोबी मंचुरियन’ खाणं पडलं महागात! 500 रुपयांचा ठोठावला दंड, व्हिडिओ व्हायरल

बेंगळुरू मेट्रोच्या डब्यात 'कोबी मंचुरियन' खात असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आहे. याप्रकरणी बीएमआरसीएलने दोषी व्यक्तीवर कारवाई करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय त्या व्यक्तीला 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

    गेल्या अनेक दिवसापासून दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल  (Viral Video) होण्याचे प्रकार समोर येत आहे. मेट्रोमध्ये अश्लील प्रकार करण्यांना आळा घालण्यासाठी DMRC कडून प्रयत्न करण्यात येत असले तरीही त्याचा लोकांवर  काहीही परिणाम झालेला दिसत नाही आहे. आता दिल्ली मेट्रो नंतर बंंगळुरू मेट्रोमधून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रोच्या डब्यात ‘कोबी मंचुरियन’ खात असताना दिसत आहे. या व्यक्तीवर बीएमआरसीएलने कारवाई करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला 500 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    बेंगळुरू मेट्रोमध्ये एक व्यक्ती नियमांना पायदळी तुडवत गोबी मंचुरियन खाताना दिसत आहे. या प्रकरणात विशेष म्हणजे ही व्यक्ती दररोज मेट्रोने प्रवास करते. ही व्यक्ती मेट्रोमध्ये कोबी मंचुरियन खात असताना त्याच्या मित्रांनी विरोध केला मात्र, त्याने दुर्लक्ष केले.

    आता बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) ने व्यक्तीच्या या कृतीवर कारवाई केली आहे. ही पहिलीच वेळ आहे की,  BMRCL ने केवळ 500 रुपयांचा दंडच ठोठावला नाही तर अशा घटनेवर गुन्हाही नोंदवला आहे. मित्रांनी दिलेल्या इशाऱ्याला त्याने हलकेच घेतले आणि नकार देऊनही तो मेट्रोमध्ये गोबी मंचुरियनचा आनंद घेत राहिल्याने या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.

    गुन्हा दाखल

    नम्मा मेट्रोशी संबंधित एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की, जयनगर पोलिस स्टेशनमध्ये प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि स्थापित नियमांचे स्पष्ट उल्लंघन केल्यामुळे दंड आकारण्यात आला आहे. आर्थिक दंडाव्यतिरिक्त, प्रवाशाने स्थानकावर प्रतिज्ञापत्र देखील दिले, ज्यामध्ये त्याने भविष्यात असे वर्तन न करण्याचे आश्वासन दिले आहे. या व्यक्तीने आपल्या मित्रांच्या मदतीने हा व्हिडीओ तर बनवलाच पण तो सोशल मीडियावर पोस्टही केला अशीही माहिती समोर आली आहे.

    यापूर्वी सप्टेंबरमध्ये BMRCL ने सायप्रियट YouTuber Phidias Panayiotou विरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती. स्वतःला ‘प्रोफेशनल मिस्टेक मेकर’ म्हणून सांगणाऱ्या पनायिओटौने मेट्रो स्टेशनमध्ये गुपचूप प्रवेश केला आणि वैध तिकीटाशिवाय प्रवास केला. या व्यक्तीच्या पलायनाचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर व्हायरल झाला होता, त्यानंतर BMRCL ने बेंगळुरूमधील केआर मार्केट पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.