उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे JEE च्या तब्बल 30 विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली; परीक्षा हॉलमध्ये एंट्रीच नाही (File Photo : Convoy)
अमरावती : मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा आला की सर्वसामान्यांच्या गाड्या थांबवण्याचे अनेक प्रकार आपण अनुभवले असतील. मात्र, अशाचप्रकारे उपमुख्यमंत्र्यांचा ताफा आल्याने JEE च्या विद्यार्थ्यांना अपेक्षित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित व्हावे लागले.
आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वाहनांचा ताफा पेंडुर्थी येथून जात होता. यादरम्यान वाहतुकीवर बंधने आल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. पेंडुर्थी येथील चिन्नामुसीदीवाडा येथील आयओएन डिजिटल झोन इमारतीत सकाळी साडेआठ वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र, विद्यार्थी वेळेत न पोहोचल्याने त्यांना परीक्षेला बसू देण्यात आलेले नाही. विशाखापट्टणममध्ये JEE या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेला बसण्यापासून 25 हून अधिक विद्यार्थांना रोखण्यात आले. हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्याने त्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याची माहिती समोर येत आहे.
अनेक विद्यार्थी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. यामुळेच परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यासाठी लादलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचण्यास उशिर झाला. पवन कल्याण यांचा ताफा आराकू जात असल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती. याचा फटका बसल्याने परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशिर झाल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही.
दोन मिनिटांमुळे नाही मिळाला प्रवेश
JEE ची एक विद्यार्थिनी 8.32 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचली होती. तरी तिला दोन मिनिटे उशिरा आल्याने प्रवेश देण्यात आला नाही. दरम्यान, 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अशाप्रकारे प्रवेश नाकारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ नये या हेतूने या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी आता केली जात आहे.