अयोध्या : अयोध्येमधील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा अनेकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. तसेच प्रत्येक देशवासियांनी दिवाळी सणाप्रमाणे 22 जानेवारी हा दिवस साजरा केला. अयोध्यानगरीसह संपूर्ण देशभरामध्ये जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अयोध्येतील नयनरम्य मूर्तीचे सर्वांनी दर्शन घेतले. आता मात्र टेक्नॉलॉजीच्या निमित्ताने रामभक्तांना अनोखे दर्शन मिळाले आहे.
अयोध्येतील सोहळ्यापूर्वीच प्रभू श्री रामांच्या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले होते. उद्घाटन सोहळ्यापूर्वी देशभरामध्ये रामांच्या चैतन्यमय मूर्तीचे दर्शन झाले. यानंतर आता ‘एआय’ टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तयार केलेला अयोध्येतील रामांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मूर्तीमधील डोळे मिचकवले जात असून प्रभू श्री रामांची नजर फिरते आहे. या व्हिडिओमधून जणू काय प्रभू राम शेकडो वर्षांनी तयार झालेले अयोध्येतील मंदिर निरखत असून राम भक्तांकडे बघत असल्याची प्रचिती या व्हिडिओमधून येत आहे.
Now who did this? ?? #Ram #RamMandir #RamMandirPranPrathistha #RamLallaVirajman #AyodhaRamMandir #Ayodha pic.twitter.com/2tOdav7GD6
— happymi (@happymi_) January 22, 2024
सोशल मीडियावर प्रभू श्री रामांची ही एआय पद्धतीचा वापर करुन हालचाल करणारी व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी ही शेअर करत आपल्या भावना कमेंट्समध्ये व्यक्त केल्या आहेत. एका रामभक्ताने लिहिले आहे की, “एक सेकंद हृदय बंद पडलं असतं. यासाठी मनाची तयारी नव्हती.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “या अनुभवाने आयुष्य सार्थकी लागलं. टेक्नॉलॉजीचा सर्वोत्तम वापर” अशा भावना राम भक्तांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.