नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि विरोधी इंडिया आघाडीचा मुख्य केंद्र असलेल्या काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या वर्षात धक्क्यांचा सामना करावा लागत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष पक्षापासून दुरावले आहेत, तर ईशान्येतील अरुणाचल प्रदेशातही पक्षाला मोठा फटका बसला आहे.
अरुणाचलमध्ये एक वगळता काँग्रेसचे सर्व आमदार भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या दिवसांपासून सुरू असलेला वाद दिल्ली दरबारात जाऊनही मिटलेला नाही. गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले अर्जुन मोधवाडिया, काँग्रेसचे दोन माजी आमदार अंबरिश डेर आणि मुलुभाई कंडोरिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकेकाळी अहमद पटेल यांच्यानंतर पक्षातील सर्वात शक्तिशाली नेते म्हणून मोधवाडीया त्यांची गणना होते. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले.
कंडेरिया आणि डेर दोघेही 2022 च्या निवडणुकीत पराभूत झाले. अंबरीश डेर आधी भाजपमध्ये होते. डेर भाजप सोडून बसपमध्ये दाखल झाले आणि नंतर 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे तीन आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते लोम्बो टायोंग यांनी 4 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला, तर दोन आमदार निनॉन्ग एरिंग आणि वांगलिन लोआंगडोंग यांनी 3 मार्च रोजी पक्ष सोडला.






