Cyclone Fengal
अमरावती : मागील 8 दिवसांपासून तापमानात घट झाल्याने थंडी वाढली होती. मात्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘फेंगल’ वादळ धडकले. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि.4) दिवसभर ढगाळ वातावरण होते. आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
हेदेखील वाचा : Fengal Cyclone: ‘फेंगल’ चक्रीवादळाचे तामिळनाडूत थैमान; 12 जणांचा मृत्यू तर…
राज्यात दोन दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहिल्यास तुरीला विशेष फरक पडणार नाही. मात्र, ढगाळ वातावरण चार ते पाच दिवस राहिल्यास तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसेल. अशावेळी शेतकऱ्यांनी तुरीवर कीटकनाशकाची फवारणी करून अळ्यांचा प्रादुर्भाव थांबवावा, असे जिल्हा कृषी अधीक्षकांनी सांगितले. या ढगाळ वातावरणामुळे सध्या सुस्थितीत असलेल्या तुरीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी घेण्याची गरज आहे. सध्या तूर फुलोऱ्यावर असून, काही शेंगांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुरीसाठी ही महत्त्वाची वेळ असताना फेंगल वादळामुळे वातावरणात अचानक बदल झाला.
निरभ्र असलेले आकाश ढगाळ झाले. हेच वातावरण 5 ते 6 डिसेंबरपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे तुरीवर अळी पडण्याची दाट शक्यता आहे. ढगाळ हवामानात अळीच्या अंड्यांना पोषक वातावरण मिळते, त्याच कारणाने आता तुरीवर अळीचा प्रकोप होऊ शकतो.
दरम्यान, या काळात तुरीवर पडलेली अळी फुल आणि शेंगांना पोखरण्याचे काम करते. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी वेळीच फवारणी करण्याची गरज आहे.
गुरुवारनंतर थंडी वाढणार
गुरुवारनंतर थंडी वाढणार आहे. फेंगल चक्रीवादळ धडकल्याचा परिणाम वातावरणात आहे. याच वादळामुळे जिल्ह्यासह विदर्भात चार दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, तापमानही 2 ते 4 अंशांनी वाढून 16 ते 19 वर जाईल. 5 डिसेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. त्यानंतर थंडीचे प्रमाण वाढणार आहे.
तामिळनाडूत चक्रीवादळाचा मोठा फटका
फेंगल चक्रीवादळाचा तामिळनाडू राज्याला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, आणि अन्य गोष्टींचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
हेदेखील वाचा : मारकडवाडी मतदान प्रकरणावर कारवाईचा बडगा;आमदार उत्तम जानकर यांच्यासह 88 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल