नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाला (Congress) मागील तीन वर्षांपासून पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी (Vote Counting) १९ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, पक्षाच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असणार, असा प्रश्न आहे. त्यातच आता कॉंग्रेसच्या खासदारांनी (Congress MP) कॉंग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री (Madhusudan Mistri) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात पक्षाध्यक्ष निवडीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु गेहलोत यांनी हे पद स्विकारण्यास नकार दिला आहे. तर, आता अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांचे नाव चर्चेत आहे. या निवडणूकीचे वेळापत्रक २२ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. यासाठी २४ ते ३० सप्टेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
शशी थरूर (Shashi Tharoor), कार्ती चिदंबरम, मनीष तिवारी, प्रद्युत बोरदोलोई, अब्दुल खालिक या खासदारांच्या नावांचा पत्रात समावेश आहे. शशी थरूर यांनी यापूर्वीही मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहिले आहे. पक्षाने कोणतेही गुप्त माहिती सार्वजनिक करावेत, असे आम्ही अजिबात वाटत नाही. उलट आम्ही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी शोधत आहोत, असे या पाच खासदारांनी पत्रात म्हटले आहे. मतदार यादी जाहीर करण्याची त्यांची मागणी चुकीच्या पद्धतीने मांडली जात असल्याचेही खासदारांनी मिस्त्री यांना सांगितले.