नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांसाठी उद्या (दि.20) मतदान होणार आहे. देशातील पाचव्या टप्प्यातील मतदान हे 49 जागांसाठी होत आहे. तत्पूर्वी ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच झारखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जाहीरसभा झाली. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोच्या लोकांना विकासाचा ABCD सुद्धा माहीत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘काँग्रेसचे राजपुत्र उद्योग, उद्योगपती आणि गुंतवणुकीला रोज विरोध करतात. येत्या काळात कोणता उद्योगपती त्यांच्या राज्यात जाऊन भांडवल गुंतवणार आहे? त्या राज्यातील तरुणांचे काय होणार?” असा सवालही मोदींनी केला. ‘काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोच्या लोकांना विकासाचा ABCD सुद्धा माहीत नाही.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘गरिबांच्या मालमत्तेचा एक्स-रे काढणे, एससी-एसटी-ओबीसीचे आरक्षण हिसकावणे, मोदीजींना रोज शिव्या देणे हे त्यांचे काम आहेत. या पलीकडे ते विचार करू शकत नाहीत. झारखंडमध्ये झामुमोने जमीन घोटाळा केला. त्यांनी गरीब आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, लष्कराच्या जमिनी बळकावल्या. त्यांच्या घरातून जप्त झालेल्या चलनी नोटांचे डोंगर तुमच्याकडून लुबाडलेले आहेत’.