दिल्लीमध्ये कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना आंदोलनामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राजकीय वातावरण तापले असून नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले. विरोधी खासदारांनी संसदेच्या मकर द्वारापासून ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यामध्ये इंडिया आघाडीमधील 300 हून अधिक खासदारांनी सहभाग घेतला होता. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
इंडिया आघाडीच्या मोर्चाला पोलिसांनी परवागनी दिली होती. तरी देखील विरोधी खासदारांनी आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी नेत्यांची धरपकड केली. पोलिसांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले. यावेळी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत ही लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी राहुल गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेताना त्यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावत प्रतिक्रिया दिली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आता बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. खरी परिस्थिती देशासमोर आली आहे. ही लढाई राजकीय नाही. तर ही संविधानाची लढाई आहे. संविधान वाचवण्याची लढाई आहे. ‘एक व्यक्ती, एक मत’ या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी ही लढाई आहे. संयुक्त विरोधी पक्ष आणि देशातील प्रत्येक मतदाराची मागणी आहे: स्वच्छ मतदार यादी. आणि, आम्हाला हा अधिकार कोणत्याही परिस्थितीत मिळेल, असा आक्रमक पवित्रा खासदार राहुल गांधी यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अखिलेश यादवांची फिल्मी स्टाईल उडी
इंडिया अलायन्सच्या या निषेधात जवळजवळ सर्व विरोधी पक्षांचे खासदार आणि प्रमुख नेते उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, डिंपल यादव, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्याव्यतिरिक्त, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकचे सर्व खासदार सहभागी झाले होते. यावेळी अखिलेश यादव यांनी पोलिसांची नजर चुकवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयापासून थोड्या अंतरावर इंडिया अलायन्सच्या नेतृत्वाखालील निषेध मोर्चा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवला तेव्हा अखिलेश यादव गर्दीतून बॅरिकेड्सवर चढले आणि गर्दीतून बाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ते पत्रकारांमध्ये पोहोचले. या दरम्यान घटनास्थळी तैनात असलेले सर्व पोलिस कर्मचारी पाहत राहिले.