पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इराण-इस्रायल युद्धावरील भाषणावर राहुल गांधी यांनी टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये भाषण करताना कोरोना काळाचा दाखला देत त्यावेळी जसा संयम दाखवला तसाच यावेळी सुद्धा दाखवण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. त्यांच्या या भाषणावर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला. ते गुजरातमधील वडोदरा येथे आयोजित आदिवासी अधिकार संविधान परिषदेत सामील झाले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होमग्राऊंडवरुन त्यांच्यावर जोरदार टीका केली.
हे देखील वाचा : जागतिक युद्धाची झळ भारतापर्यंत..राज्यसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडणार सत्यस्थिती
काय म्हणाले राहुल गांधी?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना केंद्र सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नसल्याचे म्हटले. राहुल गांधी यांनी देशासमोर उभ्या असलेल्या आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांवर सरकारकडे ठोस दिशा नाही अशा शब्दांत टीका केली. तसेच देशात सामान्य लोकांच्या गॅसबाबत एवढं संकट निर्माण झालं असताना मोदींनी अमेरिकेच्या विरोधात एक शब्दही का काढला नाही असा घणाघाती सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
भारतीयांवर कराचा बोजा वाढला
भारत-अमेरिका व्यापार करारावरुन देखील राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, “कृषी क्षेत्र प्रथमच अमेरिकेसाठी खुले केले. तसेच मोदी सरकारने भारताचा मौल्यवान डेटा अमेरिकेला दिल्याची टीका त्यांनी केली. मोदी सरकारने अमेरिकन कंपन्यांना कर सवलती दिल्या, तर भारतीयांवर कराचा बोजा वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. आपण अमेरिकेला खूप काही दिलं, पण बदल्यात काही मिळालं नाही,” अशी खंत देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : सकाळी ७:२८ ला आला ईमेल आणि दिल्ली हादरली; विधानसभा अन् मेट्रो स्टेशनवर बॉम्बची धमकी
पंतप्रधान मोदी राज्यसभेमध्ये मांडणार भूमिका
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. काल (दि.23) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये सत्यस्थिती मांडली. जागतिक युद्धाच्या वातावरणामध्ये भारताची भूमिका काय यासह त्यांनी भारतीयांना संयम ठेवण्याचे आणि एकत्रित राहण्याचे देखील आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी २ वाजता राज्यसभेत मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर निवेदन देतील. यावर देशाची भूमिका आणि देशातील सध्याची परिस्थिती ते मांडणार आहेत. यामध्ये देश म्हणून भारत काय भूमिका घेणार आणि बजावणार याबाबत पंतप्रधान मोदी मत मांडणार आहेत.






