देशातील जिल्हा काँग्रेस समितीच्या अधिकारात वाढ करणार (संग्रहित फोटो : काँग्रेस)
नवी दिल्ली : लोकसभा आणि त्यानंतर काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून आपल्या पक्षसंघटनेत सातत्याने बदल केला जात आहे. बिहारसह काही राज्यात प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी देखील बदलण्यात आले आहेत. त्याचवेळी, उत्तर प्रदेशमध्ये, जिल्हाध्यक्ष घोषित करून ते आक्रमक भूमिका घेत आहे. दरम्यान, पक्ष आता तिकीट वाटपासाठी एक नवीन प्रक्रिया आणण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.
तिकीट वाटपासंदर्भातील या नव्या प्रक्रियेंतर्गत सत्तेचे विकेंद्रीकरण केले जाईल आणि जिल्हास्तरीय पक्ष संघटनेला (जिल्हा काँग्रेस समितींना) अधिक अधिकार दिले जातील. गुरूवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली 338 जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल देखील उपस्थित होते. याबाबत काँग्रेस पक्षाचे मीडिया प्रभारी पवन खेरा म्हणाले की, ‘निवडणुकीत तिकिटांच्या वाटपासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याच्या प्रस्तावावर पक्ष विचार करत आहे’.
पवन खेरा यांनी सांगितले की, ‘काँग्रेसच्या या बैठकीत पक्ष त्यांच्या जिल्हा काँग्रेस समितीला अधिक अधिकार देईल आणि त्यांना स्वायत्तपणे काम करण्यासाठी अनेक गोष्टींमध्ये स्वातंत्र्य देईल यावर चर्चा झाली. निवडणुकीसाठी तिकीट वाटपात डीसीसीला भूमिका देण्याच्या प्रस्तावावर बैठकीत सकारात्मक विचार करण्यात आल्याचे पवन खेरा यांनी म्हटले आहे.
‘जिल्हा काँग्रेस समित्या आर्थिक सक्षम करणार
पक्ष जिल्हा काँग्रेस समितींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम करीत आहे जेणेकरून ते त्यांच्या क्षेत्रातही अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि राज्य काँग्रेस समितीचे कार्यक्रम सहजपणे राबवू शकतील. म्हणूनच जिल्हा काँग्रेस समितीला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी लवकरच काही निर्णय घेतले जातील. जिल्हाध्यक्षांसोबतच्या या बैठकीबाबत पवन खेरा म्हणाले की, काँग्रेस नेतृत्व आणि जिल्हाध्यक्षांमधील हा संवाद द्विपक्षीय होता. बैठकीत, खर्गे, राहुल गांधी आणि माकन यांच्याव्यतिरिक्त, प्रत्येक राज्यातील एक किंवा दोन जिल्हाध्यक्षांना त्यांचे विचार मांडण्याची संधी देण्यात आली, जिथे त्यांनी उघडपणे त्यांचे सूचना आणि विचार मांडले.