Photo Credit- Social Media ED च्या चार्जशीटविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, दिल्लीत राजकारण तापलं
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांवर केंद्रीय एजन्सींचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत दिल्लीसह देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी जोरदार निदर्शने केली. दिल्लीतील अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी “लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न” होत असल्याची टीका केली.
या निदर्शनांदरम्यान काँग्रेस नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र हे पूर्णतः निराधार आणि बेकायदेशीर आहे. ईडी, सीबीआय यांसारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा विरोध केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसून देशभरातील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि अन्य केंद्र सरकारी कार्यालयांबाहेरही अशाच स्वरूपात निदर्शने झाली. पक्षाने याला “विरोधकांचा आवाज दाबण्याचे षड्यंत्र” असल्याचा आरोपही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
‘भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे’; विजय वडेट्टीवार यांचा टोला
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची टीका
कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनीही केंद्र सरकारवर टीका करत या संपूर्ण प्रकरणाला “सूडाचे राजकारण” म्हटले. सरकार विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
इम्रान प्रतापगढ़ींची प्रतिक्रिया
काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना ईडीवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींच्या गुजरात भेटीच्या पार्श्वभूमीवरच आरोपपत्र दाखल करण्यात आले, याकडे लक्ष वेधत त्यांनी भाजपवर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना लक्ष्य करण्याचा आरोप केला. बिहार, गुजरात आणि आसाममधील निवडणुका लक्षात घेता ही रणनीती आखण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशव्यापी आंदोलनाचा इशारा
या कारवायांमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने जर ही दडपशाही सुरूच राहिली, तर देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, सत्य आणि न्यायाच्या बळावरच ते या लढ्याला सामोरे जातील. निषेधात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचून खरे चित्र मांडण्याचा आणि लोकशाही रक्षणाचा निर्धार व्यक्त केला.
नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस ओव्हरसीजचे प्रमुख सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतर काही नेत्यांविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे. चार्जशीट राऊज अव्हेन्यू कोर्टात सादर करण्यात आली असून, या प्रकरणातील पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे.
ही कारवाई असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांशी संबंधित असून, ईडीने या दोन्ही संस्थांच्या एकूण सुमारे ७५१.९ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यापैकी ६६१.६९ कोटी रुपयांची मालमत्ता AJL ची तर ९०.२१ कोटी रुपयांची मालमत्ता यंग इंडियनशी संबंधित आहे. ही मालमत्ता कथितपणे गुन्हेगारी उत्पन्नातून खरेदी करण्यात आली होती, असा आरोप ईडीने केला आहे.