नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश ते कर्नाटकपर्यंत प्रत्येक पक्षांना क्रॉस व्होटिंगचा फटका बसला. यामुळे हिमाचलात बहुमत असतानाही काँग्रेस उमेदवाराला पराभवाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवली. काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी पराभूत झाले. भाजप व काँग्रेसला समसमान 34 मते मिळाल्यामुळे सामना रोमांचक झाला होता. अखेरीस टॉसद्वारे करण्यात आलेल्या निर्णयात भाजप उमेदवार हर्ष महाजन यांना विजयी घोषित करण्यात आले.
उत्तर प्रदेशातही भाजपला सपामध्ये फूट पाडण्यात यश आले. सपाचे 8 आणि बसपाच्या एका आमदाराने पक्षाविरोधात कॉस व्होटिंग केले. त्यामुळे भाजपाचा 8 वा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. कर्नाटकात काँग्रेसने भाजपाच्या गोटात खळबळ उडवून दिली. येथे भाजप आमदार एस.टी. सोमशेखर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिले तर भाजप आमदार शिवराम हेब्बर गैरजर राहिले.
भाजप-जेडीएसचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना पराभव स्वीकारावा लागला. कर्नाटकात काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन, नासिर हुसैन मतमोजणीत काँग्रेसच्या तीनही उमेदवारांनी क्रमश: 47, 46, आणि 46 मते घेत विजय मिळविला.
हिमाचलमध्ये टॉसद्वारे उमेदवाराची निवड
हिमाचलात काँग्रेसचे 40 उमेदवार आहेत. काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे मतांची संख्या 34 वर घसरली. तर भाजपाच्या गोटात ही 6 मते गेल्यामुळे भाजपाच्या मतांची संख्या : 31 वर पोहोचली. तीन अपक्ष आमदारांनीदेखील भाजपाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे भाजपाच्या मतांची संख्यादेखील 34 वर पोहोचली. यानंतर विजयाचा निवाडा करण्यासाठी टॉस करण्यात आला. यात भाजपाचे हर्ष महाजन विजयी घोषित झाले.