नवी दिल्ली : मद्य घोटाळा प्रकरणी (Liquor Policy Case) दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती. सिसोदिया यांना आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर आता त्यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली आहे.
सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या वकिलांच्या युक्तिवादाला विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला की, सीबीआय कोणत्याही परिस्थितीत तपास करू शकते. मनीष सिसोदिया यांचे वकील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर म्हणाले की, निवडून आलेल्या सरकारला काय करायचे आहे, आज एक चौकशी स्थापन करण्यात आली आहे, ती देखील जेव्हा एलजीने घटनात्मक कार्यकर्ता म्हणून मान्यता दिली होती. मनीष सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीवरील निर्णय राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने राखून ठेवला होता.
सिसोदिया यांना गलिच्छ राजकारणाचा बळी बनवलं जातंय
मनीष सिसोदिया यांच्या 5 दिवसांच्या कोठडीबाबत दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय म्हणाले, आज मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर केले आणि सिसोदिया यांना रिमांडवर ठेवण्याचा युक्तिवाद केला. ५ दिवसांची कोठडी का हवी, असा सवाल न्यायालयाने केला. सीबीआय रिमांडसाठी ठाम राहिली. न्यायालयाने कोठडी सुनावली. घर, कार्यालय, गाव, लॉकर काहीही सापडले नाही. मनीष सिसोदिया यांना गलिच्छ राजकारणाचा बळी बनवले जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.