28 लाखांची नोकरी सोडून बनला ठग; IIT च्या मित्रासोबत 400 कोटींहून अधिक रुपयांचा लावला चूना
राजस्थानमधील भरतपूरमध्ये उघडकीस आलेल्या 400 कोटी रुपयांच्या मोठ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक अटक करण्यात आली आहे. भरतपूर रेंज पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एका आरोपी देवेंद्रपाल सिंहला अटक केली आहे, ज्याने त्याचा आयआयटीयन मित्र शशिकांतसोबत मिळून हे फसवणूकीचे जाळे रचले होते. विशेष म्हणजे देवेंद्रपाल सिंहने 28 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी सोडून गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला.
माध्यमांच्या वृत्तानुसार, या टोळीने आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना आमिष दाखवून त्यांच्या नावावर बनावट कंपन्या नोंदणी केल्या. या लोकांची कागदपत्रे घेऊन त्यांना कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले आणि त्या बदल्यात त्यांना नाममात्र पगार देण्यात आला. त्याच वेळी, खरे ऑपरेशन शशिकांत, देवेंद्रपाल आणि रोहित सारख्या लोकांकडून केले जात होते. या बनावट कंपन्यांद्वारे गेमिंग, गुंतवणूक आणि ई-कॉमर्सच्या नावाखाली लोकांकडून पैसे वसूल केले जात होते. टोळीतील आणखी एक सदस्य, ज्याला रिसेलर म्हणतात, गरिबांना फसवून कागदपत्रे गोळा करायचा.
6 मार्च 2025 रोजी हरिसिंह नावाच्या व्यक्तीने धोलपूर सायबर पोलिस स्टेशनमध्ये 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर सायबर फसवणुकीची तक्रार केली होती. तपासात असे दिसून आले की पीडिताचे 35 लाख रुपये फिनो पेमेंट बँकेद्वारे चार वेगवेगळ्या कंपन्यांच्या खात्यांमध्ये पाठवण्यात आले होते. ही खाती गोठवण्यात आली आणि 4 कोटी रुपये जप्त करण्यात आले.
8 मे रोजी रात्री दिल्लीतील मोहन गार्डनमधून दिनेश सिंग. त्याची पत्नी कुमकुम आणि रवींद्र सिंह यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस पोहोचले तेव्हा ते पंखा नसलेल्या खोलीत जमिनीवर झोपलेले आढळले. चौकशीदरम्यान, हे दोघेही अशिक्षित असल्याचे उघड झाले आणि शशिकांत त्यांच्या नावावर नोंदणीकृत कंपनी चालवत होता.
मीडिया रिपोर्ट्समध्ये आयजी भरतपूर रेंज राहुल प्रकाश यांनी म्हटले की, देवेंद्रपाल हा उप्रतील प्रयागराज जिल्ह्यातील बामरोली गावचा रहिवासी असून त्याने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. तो त्याच्या बालपणीचा मित्र शशिकांतसोबत शेल कंपन्या तयार करून ही फसवणूक करत होता. आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. तर मास्टरमाइंड शशिकांत आणि त्याचा साथीदार रोहित दुबे फरार आहेत. शशिकांत आणि रोहित दुबे यांनी मिळून ‘अॅब्युडन्स पेमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (ट्रायपे)’ नावाची कंपनी स्थापन केली आहे, ज्याचे मुख्यालय बंगळुरूमध्ये होते.