आणखी ४८७ भारतीय नागरिक अमेरिकेतून होणार हद्दपार, डोनाल्ड ट्रम्प सरकारने जारी केले आदेश
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोठे निर्णय घेत जगाला धक्का दिला आहे. या निर्णयांमध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचा मुद्दा चर्चेचा बिषय बनला असून वादग्रस्तही ठरला आहे. दरम्यान अमेरिकेने बुधवारी त्यांच्या देशात बेकायेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवलं. आता आणखी ४८७ भारतीयांना माघारी पाठवणार आहे. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अमेरिकेने केंद्र सरकारला त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४८७ भारतीय नागरिकांची माहिती दिली असून, त्यांच्या हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आल्याचं ते म्हणाले.
विक्रम मिस्री म्हणाले की, “अमेरिकेने भारताला ४८७ भारतीय नागरिकांबद्दल माहिती दिली आहे, ज्यांना हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आम्ही अमेरिकन प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, माघारी पाठवत असलेल्या भारतीयांशी कोणतेही अमानुष वर्तन सहन केले जाणार नाही. जर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाची माहिती मिळाली तर, आम्ही वरिष्ठ पातळीवर हा मुद्दा उपस्थित करू, असं त्यांनी म्हटलं आहे.
याशिवाय, परराष्ट्र सचिवांनी पत्रका परिषदेत, बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणाऱ्या टोळ्या आणि नेटवर्क्सविरुद्ध ठोस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. “बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणाऱ्या टोळ्या आणि नेटवर्क्सविरुद्ध आपल्याला कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
बुधवारी, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. यामध्ये ३० जण पंजाबचे, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी ३३ जण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन जण आहेत, तर दोन जण चंदीगडचे आहेत. यामध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
दरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांवर कारावई करण्याआगोदर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने ब्राझील आणि कोलंबियाच्या अशा शेकडो नागरिकांना मायदेशी पाठवले आहे. यानंतर त्यांच्या या निर्णयावर दोन्ही देशांनी नापसंती दर्शवली होती.