नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. १ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल आणि त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. काँग्रेसच्या एकापेक्षा जास्त नेत्यांनी अर्ज भरल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल.
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक २००० मध्ये झाली होती. तेव्हा सोनिया गांधींसमोर जितेंद्र प्रसाद होते. सोनिया गांधींना सुमारे ७४४८ मते मिळाली, पण जितेंद्र प्रसाद यांना ९४ मते पडली. २००० मध्ये सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या तेव्हा गांधी कुटुंबाला कोणत्याही आव्हानाचा सामना करावा लागला नव्हता.
आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या वाढली आहे. याआधी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांची नावे समोर येत होती, मात्र आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारीही यात सामील झाले आहेत.