संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

हिमाचल प्रदेशमध्ये खराब हवामानामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह 112 रस्ते बंद करण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यातील उंच डोंगर आणि आदिवासी भागात काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी झाली, तर विविध डोंगराळ भागात अधूनमधून पाऊस सुरू आहे.

  शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये खराब हवामानामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह 112 रस्ते बंद करण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यातील उंच डोंगर आणि आदिवासी भागात काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी झाली. तर विविध डोंगराळ भागात अधूनमधून पाऊस सुरू आहे. हवामान विभागानुसार, लाहौल आणि स्पितीच्या हंसा आणि कोकसरमध्ये अनुक्रमे पाच सेंटीमीटर आणि दोन सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली.

  हवामान खात्याने सांगितले की, ज्या भागात सर्वाधिक पाऊस झाला त्यात कोठी, चंबा, मनाली, जोत, डलहौसी, केलॉन्ग, कांगडा आणि कासोलचा समावेश आहे. शुक्रवारी राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

  राज्यात 21 एप्रिलपर्यंत पडू शकतो पाऊस

  हवामान खात्यानुसार, गुरुवारपासून वायव्य भारताला पुन्हा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. बुधवार वगळता राज्यात 21 एप्रिलपर्यंत पाऊस पडू शकतो, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. राज्यातील किमान तापमानात कोणताही मोठा बदल झालेला नाही आणि केलॉन्ग हे 0.1 अंश सेल्सिअस किमान तापमानासह सर्वात थंड ठिकाण राहिले.

  उन्हाळ्यात गारपीट आणि पावसाचे कारण

  हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 18 एप्रिलपासून राज्यांमध्ये हिमवृष्टी, पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. कारण देशात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे. हा वेस्टर्न डिस्टर्बन्स किती मजबूत असेल हे सांगता येत नाही. एक-दोन दिवसांनीच वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अचूक अंदाज येऊ शकतो.