'अरे अरे गोपीचंद...काय रे तुझा छंद...' राष्ट्रवादी शरद पवार गटाची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ पार पडत असून आज (शनिवार, १३ जून) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सत्त्ताधारी नेत्यांनी यावरून रोहित पवार यांना लक्ष्यही केले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून रोहित पवारांवर टीकास्त्र सोडले होते. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी गोपीचंद पडळकरांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर टीका करताना म्हंटले कि, “केवळ नाटक करण्यापुरतं आमदार रोहित पवारांचं आंदोलन आहे. कशी ऍक्टिंग करायची हे रोहित पवारांना चांगलं माहिती आहे. तसेच असलं शेतकऱ्यांच्या कोरड्या कळवळ्याचे नाटक कशाला करताय? हे चित्रपटाचे शूटिंग आहे का? नटरंग चित्रपटाचे शूटिंगची एक्टिंग करायला गेला आहे का ?” अशा परखड शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावावर टीका केली आहे. आता यावरून रविकांत वर्पे यांनी आपल्या ‘x’ अकाऊंटवरून पोस्ट करत चांगलीच आगपाखड केली आहे.
रविकांत वर्पेनी “अरे अरे गोपीचंद…काय रे तुझा छंद” म्हणत पडळकरांना टोला मारला आहे. आपल्या पोस्ट मध्ये ते लिहितात, “राज्यात सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कर्जमाफीवर सरकार स्पष्ट बोलण्यास तयार नाही. विकतच्या डिझेलसाठीदेखील शेतकऱ्यांना दिवसेंदिवस रांगा लावाव्या लागतात. खत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या आया बहिणींनाही आता तुम्ही रस्त्यांवर रांगा लावण्यास भाग पाडलं आणि तरीही स्वतःच्या सरकारला जाब विचारायचं सोडून तू फिरून फिरून रोहितदादांच्या साखर कारखान्यांवर येतोस. त्यांनी कष्टातून व्यवसाय उभा केलाय. त्यांनी साखर कारखान्याद्वारे हजारो रोजगार उपलब्ध केले. विविध संस्थांच्या माध्यमातून सहकाराचे जाळे उभारले आणि तू काय केलंस…?”
अरे अरे गोपीचंद…काय रे तुझा छंद… राज्यात सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कर्जमाफीवर सरकार स्पष्ट बोलण्यास तयार नाही. विकतच्या डिझेलसाठीदेखील शेतकऱ्यांना दिवसेंदिवस रांगा लावाव्या लागतात. खत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या आया बहिणींनाही आता तुम्ही रस्त्यांवर रांगा लावण्यास भाग… pic.twitter.com/czGVeV5FVG — Ravikant Varpe रविकांत वर्पे (@ravikantvarpe) June 13, 2026
ते पुढे म्हणाले,”धर्माचा बाजार मांडलास आणि स्वतःचे खिसे भरलेस…काही दिवसांनी येणाऱ्या सण-उत्सवांमध्ये डीजेच्या ऐवजी तुलाच वाजवायला नेतील. तु फुकटचा तोंडाचा पट्टा चालवतोस आणि रोहितदादा रोजगाराचा… यामुळे तोंडाचा पट्टा चालवणं सोपं असतं; पण सहकाऱ्यांसाठी, मायबाप शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, अन्नत्याग करणे हे सोपं नसतं… अरे रे रे… विसरलोच… त्याग आणि तुझा तसा काय संबंध रे…? तू हल्ली ५६ भोग खाणाऱ्यांच्या पंक्तीत बसतोस, यामुळे तुला शेतकऱ्यांच्या मीठ भाकरीची काय चव राहणार आणि काय तुझं इमान राहणार…”
ते पुढे म्हणाले, “तू ज्यांच्याशी इमानदार आहेस त्यांची टिमकी वाजव… निवडणूक आली की माय बाप शेतकरी म्हणून रस्त्यांवर तोंडाचा पट्टा वाजव… आमदारकी आली की भाजपमधील वरिष्ठांसमोर त्यांनी तुझ्या पायात बांधलेलं घुंगरू वाजव… त्यामुळे शेवटी पुन्हा म्हणावसं वाटतं, अरे गोपीचंद… काय रे तुझा छंद…” असे म्हणत त्यांनी शेलक्या शब्दांत पडळकरांवर टीका केली.
रोहित पवारांना आव्हान Dयेत पडळकर म्हणाले की, “जोपर्यंत साखर कारखान्याने एफआरपी दिलेली नाही ती एफआरपी जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे, सोलापूर एसपी साहेबांना माझी विनंती आहे. पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारांच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका, नुसत्या बातमीपुरत, नाटक करण्यापुरतं, रोहित पवाराचं हे आंदोलन आहे, ते होता कामा नये. रोहित पवारांनी व पवार कुटुंबांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल दरात म्हणजे ६ कोटीपासून यांनी ढापलेत. जे कारखाने 100 ते 200 कोटीचे कारखाने कशाला ढापले ?तुम्ही हे नाटक करताय हे काय पिक्चरच शूटिंग चालू आहे का?” असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.






