काँग्रेसचा 'वोट चोरी'वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला (Photo Credit - X)
“संघ म्हणतो सत्य नाही, सत्ता महत्त्वाची”
राहुल गांधी यांनी या वेळी अंदमान निकोबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. मोहन भागवत म्हणाले होते की, “जग सत्याला नाही तर शक्तीला मानते, ज्याच्या हातात शक्ती आहे त्यालाच मानले जाते.” राहुल गांधी म्हणाले की, “ही मोहन भागवत यांची आणि आरएसएसची विचारधारा आहे. जगातील प्रत्येक धर्माची विचारधारा सांगते की सत्य सर्वात महत्त्वाचे आहे. पण भागवत म्हणतात की सत्याची गरज नाही, सत्ता सर्वात महत्त्वाची आहे.”
LIVE: Shri Rahil Gandhi ji at Vote Chor, Gaddi Chhod Maha Rally | Ramlila Maidan, Delhihttps://t.co/cX7taLrx36 — Srinivas BV (@srinivasiyc) December 14, 2025
सत्याच्या बळावर मोदी-शहांना हटवणार
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, आपल्या धर्मात ‘सत्यम शिवम सुंदरम्’ म्हटले जाते, म्हणजे सत्य सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हा देश सत्यावर चालतो. देशातील जनता सत्याला समजते आणि सत्यासाठी लढते. “पण संघासाठी सत्य नाही, सत्ता महत्त्वाची आहे. मात्र, मी तुम्हाला खात्री देतो की, आम्ही सत्याच्या बळावर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएसचे हे सरकार सत्तेतून हटवू.”
निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतोय
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे. आयोगाने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ते असत्याच्या बाजूने आहेत.” त्यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयुक्तांसाठी कायदा बदलला. ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासाठी पंतप्रधानांनी कायदा बदलला.
कारवाईचा इशारा…
“ते नवा कायदा घेऊन आले आणि म्हणाले की, निवडणूक आयुक्तांनी काहीही केले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. आम्ही हा कायदा बदलू आणि तुमच्यावर कारवाई करू, कारण आम्ही सत्याची लढाई लढत आहोत आणि तुम्ही असत्याच्या बाजूने उभे आहात.”
“अमित शहांचे हात कापत होते”
राहुल गांधी म्हणाले, “सभागृहात अमित शहांचे हात कापत होते. त्यांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंतच ते बहादुर आहेत. ज्या दिवशी सत्ता जाईल, त्याच दिवशी त्यांची बहादुरीही निघून जाईल.”
प्रियंका गांधींचे भाजपला आव्हान
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी भाजपला आव्हान दिले. त्या म्हणाल्या की, संसदेत राष्ट्रगीतावर चर्चा होते, पण लोक ज्या समस्यांशी झगडत आहेत – बेरोजगारी, महागाई, पेपर लीक यावर चर्चा करण्याची हिंमत भाजपमध्ये नाही. “मी भाजपला आव्हान देते की त्यांनी एकदा बॅलेट पेपरवर निष्पक्ष निवडणूक लढवून दाखवावी. ते कधीही जिंकू शकणार नाहीत आणि ही गोष्ट भाजपलाही माहीत आहे.” प्रियंका गांधी म्हणाल्या की, इतिहासात प्रथमच संपूर्ण विरोधी पक्ष म्हणत आहे की, आम्हाला निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही. आज देशातील प्रत्येक संस्था मोदी सरकारने आपल्यापुढे झुकवली आहे.






