‘ऑपरेशन अजय’ आजपासून सुरू; इस्रायलमधील भारतीयांना सुरक्षित आणले जाणार मायदेशी

इस्त्रायल आणि हमासमधील युद्धादरम्यान भारत आपल्या नागरिकांच्या मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी आज गुरुवारपासून मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन अजय' (Operation Ajay) असे नाव देण्यात आले. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

    नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमासमधील युद्धादरम्यान भारत आपल्या नागरिकांच्या मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी आज गुरुवारपासून मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) असे नाव देण्यात आले. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

    ते म्हणाले की, इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या आमच्या नागरिकांना परत येण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष चार्टर विमाने आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे. आम्ही परदेशात आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. सुमारे 18 हजार भारतीय नागरिक कामासाठी किंवा अभ्यासासाठी इस्त्रायलमध्ये राहत आहेत. येथे राहणाऱ्या भारतीयांचा मोठा भाग काळजीवाहू म्हणून काम करतो; परंतु तेथे सुमारे एक हजार विद्यार्थी, अनेक आयटी व्यावसायिक आणि हिरे व्यापारीदेखील आहेत.

    आपत्कालीन संयुक्त सरकार

    हमासशी लढण्यासाठी इस्रायलने बुधवारी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकत्र करून आपत्कालीन संयुक्त सरकार स्थापन केले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, माजी संरक्षणमंत्री आणि मध्यवर्ती विरोधी पक्षनेते बेनी गॅझ यांच्या भेटीत, संयुक्त सरकार स्थापन करण्यास सहमती दर्शविली जी पूर्णपणे युद्धावर लक्ष केंद्रित करेल. गॅट्झच्या नॅशनल युनिटी पार्टीने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.