देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन
कोटा : देशभरात आज दसरा सण साजरा केला जात आहे. याची तयारीही जोरात सुरू आहे. या दिवशी लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शैलीत रावणाचे पुतळे तयार करतात, हे पुतळे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. राजस्थानमधील कोटा येथेही दसऱ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. शहरात रावणाच्या 221.5 फूट उंचीच्या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. हा पुतळा आतापर्यंत बनवलेला सर्वात उंच रावणाचा पुतळा असणार आहे.
राजस्थानातील हा पुतळा दिल्लीतील 210 फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्यापेक्षाही मोठा आहे. या पुतळ्याचा आशिया आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये समावेश केला जाईल. यावर्षी, कोटा येथे बनवलेल्या रावणाच्या पुतळ्यामध्ये एक अनोखी कलाकृती असणार आहे. पाऊस असूनही हा पुतळा पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर राहणार आहे. अंबाला येथील कारागीर तेजेंद्र चौहान आणि त्यांच्या 25 सदस्यांच्या टीमने हा पुतळा तयार करण्यासाठी चार महिने काम केले. रावणाच्या दोन्ही बाजूला कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे 60 फूट उंच पुतळे देखील ठेवण्यात आले आहेत.
तेजेंद्र चौहान यांनी सांगितले की, रावणाच्या पुतळ्याचे वजन अंदाजे 13.5 टन आहे, ज्यामध्ये 10.5 टन स्टील वापरण्यात आले आहे. पुतळ्याच्या चमकदार पोशाखासाठी 4000 मीटर मखमली कापडाचा वापर करण्यात आला आहे. रावणाचा 25 फूट उंच चेहरा 300 किलोग्रॅम वजनाचा फायबरग्लासपासून बनलेला आहे. पुतळ्याची चौकट बांबू आणि अंदाजे 200 किलोग्रॅम दोरीने बनलेली आहे. तो बसवण्यासाठी इंदूरहून 220 टन क्षमतेची एक विशेष क्रेन आणण्यात आली होती.