Indigo Crisis : सातव्या दिवशीही इंडिगोची विमानसेवा ठप्प; तब्बल 562 उड्डाणे रद्द, प्रवाशांमध्ये तीव्र संताप(Photo Credit - X)
नवी दिल्ली : इंडिगो एअरलाईन्समधील संकट प्रवाशांच्या अडचणीचे कारण ठरताना दिसत आहे. सातव्या दिवशीही उड्डाणे रद्द करणे आणि विलंब सुरूच राहिला. वैमानिक आणि क्रू मेंबर्सच्या कमतरतेमुळे इंडिगोने 562 उड्डाणे रद्द केली. देशभरातील विमानतळांवर अडकलेले प्रवासी एअरलाईन्स कर्मचाऱ्यांवर आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. विमानांची उड्डाणे रद्द झाल्यानंतरही अनेकांना त्यांच्या बॅगा परत मिळाल्या नाहीत.
दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसह अनेक विमानतळांवर प्रवाशांच्या बॅगा आणि सामानाचे ढीग साचले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेचा ६५% वाटा असलेल्या इंडिगोवरील संकटामुळे हजारो लोक संकटात सापडले आहेत. उड्डाणे रद्द केल्याने आणि त्यांचे मार्ग बदलल्याने हजारो सुटकेस आणि बॅगा सुस्थितीत नसल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये पासपोर्टसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. असे जरी असले तरी प्रवाशांच्या बॅगा लवकर परत करण्याच्या इंडिगोला सरकारने सूचना देऊनही, लोकांना बराच वेळ वाट पाहावी लागत आहे.
हेदेखील वाचा : Indigo Crisis Update : हजारो प्रवाशांना दिलासा! सरकारच्या कडक कारवाईनंतर 48 तासांत सर्व बॅगा परत, रिफंड देखील आजच
प्रवाशांमध्ये या गोष्टींमुळेही तीव्र संताप आहे. काही प्रवासी तीन ते चार दिवसांपासून त्यांच्या सामानाची वाट पाहत आहेत. येथील एक प्रवासी त्यांच्या आईसोबत लग्नाला उपस्थित राहण्यासाठी कानपूरहून पुण्याला प्रवास करत होते. चेक-इनच्या वेळी त्यांनी त्यांचे सामान दिले होते. आता, त्यांचे सामान कधी मिळेल हे सांगता येत नाही. ही फक्त एका प्रवाशाची गोष्ट नाही तर हजारो प्रवाशांचे सामान अडकले आहे.
827 कोटी करण्यात आले परत
विमान प्रवाशांच्या ४५०० बॅगा परत देण्यात आल्या आहेत. यातील ८२७ कोटी रुपये परत करण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, रद्द केलेल्या १३४ विमान उड्डाणे दिल्लीत होती. विमान कंपनीने ९००० बॅगांपैकी ४५०० बॅगा प्रवाशांना परत केल्या आहेत. २१ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान ९५५५९१ तिकिटे रद्द करण्यात आली. प्रवाशांना ८२७ कोटी रुपये परत करण्यात आले.
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी एअरलाईन्सने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. विमानं रद्द झाल्याने प्रभावित झालेल्या प्रवाशांनी त्यांच्या विमानांचे वेळापत्रक बदलल्यास त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परतावा आणि बुकिंगशी संबंधित कोणत्याही समस्या त्वरित सोडवण्यासाठी विशेष मदत केंद्र देखील स्थापन करण्यात आले आहेत. सरकारचे स्पष्ट उद्दिष्ट म्हणजे संकटामुळे उद्भवणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवणे हे आहे. जेणेकरून विमान प्रवास पुन्हा आनंददायी होऊ शकेल आणि त्यांना कोणताही विलंब होऊ नये.
हेदेखील वाचा : Indigo Crisis वरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “… हे तपासणे अत्यंत गरजेचे”






