नवी दिल्ली: तीन वर्ष बंद असलेली कैलास-मानसरोवर(Kailas Mansarovar yatra) यात्रा यावर्षी पुन्हा सुरु होणार आहे. त्यासाठी व्हिसा देण्यास चीननं (China) सुरुवात केली आहे. मात्र या यात्रेसाठीचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. तसंच यात्रेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. आता एका भारतीय नागरिकाला कैलास-मानसरोवरचं दर्शन घ्यायचं असेल तर किमान 1.85 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. (Kailas Mansarovar yatra 2023)
जर यात्रेकरुंनी आपल्या मदतीसाठी नेपाळहून एखाद्या गड्याला किंवा मदतनीसाला बरोबर घेतलं तर त्यासाठी 300 डॉलर्स म्हणजेच 24 हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. या शुल्काला ग्रास डॅमेज फी असं नाव देण्यात आलंय. यात्रेकरु ज्यावेळी कैलास पर्वताचं दर्शन घेतात, त्यावेळी त्या परिसरातील गवताचं नुकसान होतं. त्यासाठी ही नुकसान भरपाई घेण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण चीनकडून करण्यात आलेलं आहे. या गवताचं होणारं नुकसान यात्रेकरुंकडून वसूल करण्याचं चीननं ठरवलेलं आहे.
[read_also content=”कुत्रा-मांजर ते सिंह-हत्तीसारखे प्राणी तुमच्या स्वप्नात येतात का? असू शकतात शुभ-अशुभ संकेत https://www.navarashtra.com/web-stories/seeing-animals-in-dreams-lucky-unlucky-signs-nrsa/”]
काठमांडू बेसवर द्यावी लागणार ओळख
चीनकडून नियमावलीत काही नव्या नियमांचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळं ही प्रक्रिया जटिल झाली आहे. आता प्रत्येक यात्रेकरुला काठमांडू बेसवर युनिक आयडेंटिफिकेशन करावं लागणार आहे. या ओळखीसाठी बोटांचे ठसे आणि डोळ्यांतील बुबुळ्ळांचं स्कॅनिंग करण्यात येणार आहे. हे कठीण नियम परदेशी यात्रेकरुंना त्यातही भारतीयांचा प्रवेश मर्यादित करण्यासाठी चीननं केल्याचं, नेपाळच्या टूर ऑपरेटर्सचं म्हणणं आहे.
नेपाळसाठी कैलास यात्रा हा मोठा व्यवसाय
नेपाळमधील टूर्स आणि ऑपरेटर्स यांच्यासाठी कैलास मानसरोवर यात्रा हा मोठा व्यवसाय मानण्यात येतो. नव्या नियमांमुळे आणि वाढलेल्या शुल्कांमुळे आता टूर ऑपरेटर्स प्रत्येक यात्रेकरुकडून प्रतिमाणसी 1.85 लाख रुपये घेत आहेत. ही यात्रा 2019 मध्ये केवळ 90 हजारांत होत होती. 1 मे पासून या यात्रेची नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा सुरु राहणार आहे. नव्या जाचक नियमांमुळे कमी संख्येने नागरिक यात्रेला जात असल्याचं टूर ऑपरेटर्सचं म्हणणं आहे.
या नव्या नियमांमुळे यात्रा जाचक
1. व्हिसा मिळवण्यासाठी यात्रेकरुंना उपस्थित राहावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीयेत. चिनी उच्चायुक्तांच्या कार्यालयाचे खेटे यासाठी मारावे लागणार आहेत. त्यानंतर काठमांडू बेस कॅम्पवर बायोमेट्रिक ओळख पटवून द्यावी लागणार आहे.
2. व्हिसा घेण्यासाठी किमान पाच जणांचा ग्रुप असणे आवश्यक करण्यात आले आहे. यातील चार जणांना व्हिसा घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे.
3. तिबेटमध्ये प्रवेश घेणाऱ्या नेपाळी मजुरांना ग्रास डॅमेटिंग फीच्या नावाखाली 300 डॉलर्स द्यावे लागणार आहेत. हा खर्च यात्रेकरुंवरच पडणार आहे. यात्रेसाठी गाईड, हेल्पर, नोकर आणि स्वयंपाकीच्या रुपात नेपाळी मजुरांसह तिबेटमध्ये प्रवेश करता येणार आहे.
4. एखाद्या मजुराला सोबत ठेवण्यासाठी 15 दिवसांसाठी 13500 प्रवासी फी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही फी 4200 रुपये इतकीच होती.
5. यात्रांचं आयोजन करणाऱ्या नेपाळी कंपन्यांना चिनी सरकारकडे 60 हजार डॉलर्स जमा करावे लागणार आहेत. नेपाळी ट्रॅव्हल कंपन्यांना परदेशी बँकांत पैसे जमा करण्याची अनुमती नाहीये. त्यामुळं ही फी कशी द्यायची, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
यात्रेसाठी लागतो 2 ते 3 आठवड्यांचा कालावधी
कैलास यात्रा 3 वेगवेगळ्या मार्गांनी करता येते
1. लिपुलेख दर्रा ( उत्तराखंड)
2. नाथू दुर्रा (सिक्कीम)
3. काठमांडू
या तिन्ही रस्त्यांनी प्रवास केल्यास किमान 14 ते कमाल 21 दिवस लागतात. 2019 मध्ये 31 हजार भारतीय यात्रेकरुंनी कैलास यात्रा केली होती. त्यानंतर यात्रा बंद करण्यात आली होती.