भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक क्रांतीकारकांनी आपलं रक्त वाहिलं. मात्र अशी एक रणगारिगिणी होती जिने देशसेवेसाठी सर्वस्व पणाला लावलं ती भारताची पहिली महिला गुप्तहेर म्हणजे निरा आर्या. उत्तर प्रदेशच्या एका श्रीमंत कुटुंबात 1904 मध्ये निरा यांचा जन्म झाला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच त्या जन्माला आल्या होत्या. मात्र त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. निरा यांनी गडगंज श्रीमंती आणि ऐशोआरामाचा त्याग करुन देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत दाखल होण्याचा निर्णय घेतला. ज्या मातीत आपण जन्माला आलो तिचं आपण काही देणं लागतो. हे त्यांच्या मनावर खोलवर रुजलं होतं. त्यांचं देशसेवेचं प्रेम अधिक उत्कट होतं गेलं ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे. सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांच्या निरा यांच्य़ावर खूप प्रभाव पडला.
तो काळ होता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी धाराधितीर्थी पडणाऱ्या वीर जवानांचा आणि यातील एक संघटना होती ती म्हणजे आझाद हिंद सेना आणि याच चळवळीच्या निरा देखील एक सदस्य होत्या. आझाद हिंद सेनेतील महिलांची वेगळी रेजिमेंट होती, त्या रेजिमेंटचं नाव होतं ‘रानी झांसी रेजिमेंट’ निरा आर्या यात भारतीय महिला गुप्तहेर म्हणून कार्यरत होत्या.
निरा आर्या यांचं व्यक्तिमत्वचं धाडसी होतं त्यामुळे त्यांनी लग्न सुद्धा एका नीडर व्यक्तीशीच केलं. निरा यांचे पती देखील ब्रिटीश लष्करात अधिकारी होते. निरा यांच्या पतीने केवळ स्वातंत्र्य चळवळीतील हलचाली लक्षात याव्यात यासाठी लग्न केलं होतं. निरा यांच्या प्रत्येक हलचालींवर त्यांच्या पतीने पाळत ठेवली होती. एके दिवशी त्यांच्या पतीने नेताजींसोबतच्या भेटीदरम्यान नीरा यांचा पाठलाग केला आणि गोळीबार करून नेताजींच्या चालकाला हत्या केली.
संतापाने उसळलेल्या निरा य़ांनी मागे पुढे कसलाही विचार न करता पतीची गोळ्या घालून ठार केलं. ही खबर ब्रिटीश राजवटीपर्यंत पोहोचली आणि निरा यांना अंदमानच्या कोठडीत कैद केलं. निरा यांच्याकडून स्वातंत्र्य चळवळीची माहिती काढून घेण्यासाठी ब्रिटीशांनी त्यांचा लाच देखील दिली. मात्र देशसेवेच्या प्रेमाने पेटून उठणाऱ्या निरा यांनी ब्रिटीशांचा प्रत्येक डाव हाणून पाडला. निरा यांच्याकडून कोणतीही माहिती मिळत नाही हे कळल्यावर ब्रिटीशांनी त्यांचा छळ केला. या अमानुष छळ करण्यात ब्रिटीश सैन्याने कोणतीही कसर मागे ठेवली नाही. निरा यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या राक्षसीपणाचा ब्रिटीशांनी इतका कळस गाठला की, निरा यांचे स्तन कापले. त्यांना मेंटली टॉर्चर केलं. प्रचंड वेदना झाल्या पण त्या एक शब्दही बोलल्या नाही.
47 च्या स्वातंत्र्यानंतर निरा यांची कैदेतून सुटका झाली. मात्र तरी त्यांचं पुढचं आयुष्य खडतर गेलं. ज्या वाघिणीने आपलं सर्वस्व पणाला लावत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळं सोसलं ती मात्र तिच्या शेवटच्या काळात हैदराबादमध्ये एका रस्त्यावर फुलं विकून पोटाची खळगी भागवत होती.1998 मध्ये 26 जुलै रोजी एका रुग्णालयात तिचा करुण अंत झाला. दुर्देवाची गोष्ट हीच की, मरण्याआधी नाहीच पण मरणोत्तर देखील या वाघिणीचा सन्मान केला गेला नाही की तिची शौर्यगाथा कोणत्या पुस्तकात आढळून आली नाही,अशा वाघिणीचा झालेला अंत डोळ्यात पाणी आणणारा आहे हेच खरं.






