कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं (Sini Shetty) मिस इंडिया 2022 (Miss India 2022) चा किताब आपल्या नावे केला आहे. देशाला यंदाच्या वर्षीची मिस इंडिया मिळाली आहे. 3 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मिस इंडिया 2022 च्या अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत सिनीनं ‘मिस इंडिया 2022’चा मुकूट आपल्या नावे केला. अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनर अप ठरली. मिस इंडियाच्या ग्रँड फिनालेमध्ये तिघीही खूप सुंदर दिसत होत्या.
मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री क्रिती सनॉन आणि लॉरेन गॉटलिएब यांनी या शोमध्ये परफॉर्म केलं. तर अभिनेता मनिष पॉलने या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. मिस इंडियाच्या परीक्षकांमध्ये नेहा धुपिया, डिनो मोरिया आणि मलायका अरोरा यांचा समावेश होता. इतकंच नव्हे तर क्रिकेटर मिताली राजसुद्धा परीक्षक होती. परीक्षकांच्या पॅनेलमध्ये राहुल खन्ना, रोहित गांधी आणि कोरिओग्राफर शामक दावर हेसुद्धा होते. मिस इंडियाचा ग्रँड फिनाले हा येत्या 17 जुलै रोजी कलर्स टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे.